पीटीआय, नवी दिल्ली
देशातील आघाडीची डिजिटल सेवा पुरवणारी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) आतापर्यँतची सर्वात मोठी ठरण्याची शक्यता आहे. सुमारे १२ लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्यांकनासह बाजारात पदार्पण आणि सूचिबद्धतेनंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये कंपनीने स्थान मिळविण्याची आशा आहे. सध्या भारतातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमध्ये विद्यमान भागधारक समभाग विक्री करण्याची शक्यता नसल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. विद्यमान भागधारकांनी हिस्सा कमी करण्यात रस दाखवलेला नाही. परिणामी आयपीओच्या माध्यमातून केवळ नवीन समभागांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सने जूनमध्ये आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून २८ ऑगस्ट रोजी अंतिम निरीक्षणे प्राप्त झाली. मसुदा प्रस्तावानुसार, कंपनी २७ कोटी नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता आहे. हे समभाग कंपनीच्या आयपीओनंतरच्या एकूण भागभांडवलाच्या सुमारे २.९ टक्के असतील. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा सुमारे ३७,७०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे.
२१ ऑक्टोबरपासून बोली?
सूत्रांच्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा सुकाणू गुंतवणूकदारांसाठीचा टप्पा १९ ऑक्टोबरला सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान आयपीओसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचारी तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सच्या उपकंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी समभाग राखीव ठेवले जाणार आहेत. अद्याप जिओ प्लॅटफॉर्म्सकडून यासंबंधाने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.
