मुंबई : वाढत्या खासगी पत (प्रायव्हेट क्रेडिट) बाजारपेठेतील संधी साधत जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंटने १,००० कोटी रुपयांच्या दुसऱ्या परफॉर्मिंग क्रेडिट अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडाची (एआयएफ) घोषणा केली आहे. ‘जेएम फायनान्शियल सिलेक्ट क्रेडिट फंड II’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या श्रेणी II एआयएफमध्ये आणखी १,००० कोटी रुपयांचा ग्रीनशू पर्यायही उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
हा फंड आर्थिकदृष्ट्या सक्षम, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या आणि स्थिर रोख प्रवाह असलेल्या कंपन्यांना कर्जपुरवठा करण्यावर भर देणार आहे. विविध क्षेत्रांतील मजबूत व्यावसायिक पाया आणि विश्वासार्ह प्रवर्तक असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यास ग्रीनशू पर्यायाच्या माध्यमातून मूळ लक्ष्यित निधीपेक्षा अधिक भांडवल उभारण्याची मुभा फंड व्यवस्थापकाला मिळणार आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या खाजगी बाजारपेठेच्या परिसंस्थेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी हा फंड महत्त्वाचे पाऊल ठरेल. संरचित वित्तपुरवठा उपाययोजनांद्वारे उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देतानाच गुंतवणूकदारांना आकर्षक जोखीम-समायोजित परतावा देण्यावर भर राहणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
“भारतीय खासगी पत बाजार झपाट्याने विकसित होत असून कंपन्या पारंपरिक भांडवली स्रोतांपलीकडे जाऊन अधिक लवचिक वित्तपुरवठा पर्यायांचा शोध घेत आहेत. हा दुसरा परफॉर्मिंग क्रेडिट फंड बदलत्या भांडवली गरजांना पूरक असे वैविध्यपूर्ण पर्यायी व्यासपीठ उभारण्याच्या आमच्या धोरणाचा भाग आहे.” असे जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ मोहंती म्हणाले.
कंपनीच्या मते, जेएम फायनान्शियल समूहाच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग, भांडवली बाजार आणि पत व्यवसायातील एकात्मिक परिसंस्थेचा लाभ या फंडाला मिळणार असून त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या व्यवहार संधी आणि मजबूत ओरिजिनेशन क्षमता उपलब्ध होईल. दरम्यान, भारतातील एआयएफ उद्योगातही मोठी वाढ होत आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ अखेर एआयएफ उद्योगातील एकूण वचनबद्धता १५.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून त्यापैकी श्रेणी II एआयएफचा वाटा सर्वाधिक ११.६४ लाख कोटी रुपये आहे.
खासगी पतपुरवठा धोरणांमध्ये वाढती गुंतवणूकदारांची रुची आणि भारतीय उद्योगांच्या बदलत्या वित्तपुरवठा गरजा लक्षात घेऊन हा नवीन फंड सुरू करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
क्रेडिट एआयएफ म्हणजे काय?
हा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडचा असा प्रकार, जो मुख्यतः कंपन्यांना कर्जरूपाने पैसा पुरवतो. हा निधी बँकेसारखा पारंपरिक कर्जदाता नसतो, पण गुंतवणूकदारांकडून पैसा उभारून तो कंपन्यांना ठरावीक व्याजदराने किंवा संरचित पद्धतीने देतो. क्रेडिट एआयएफ म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचा असा फंड, जो कंपन्यांना ‘पर्यायी कर्जपुरवठा’ करतो.
हे कसे काम करते?
श्रीमंत गुंतवणूकदार, फॅमिली ऑफिस, संस्थात्मक गुंतवणूकदार फंडात पैसा गुंतवतात.
फंड व्यवस्थापक तो पैसा निवडक कंपन्यांना कर्ज म्हणून देतो.
त्या बदल्यात कंपनीकडून व्याज किंवा परतावा मिळतो.
मिळालेला परतावा गुंतवणूकदारांना वाटला जातो.
