JP Morgan Lorna Hajdini has been sued for sexual harassment against an Indian origin employee: जेपी मॉर्गन चेसमधील एक उच्चपदस्थ अधिकारी, लॉर्ना हजदिनी यांच्यावर लैंगिक छळ आणि वर्णद्वेषी टीकेचा आरोप करणारा खटला दाखल करण्यात आला आहे. २७ एप्रिल रोजी न्यूयॉर्क काउंटी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली ही तक्रार, एका कनिष्ठ पुरुष सहकाऱ्याने केली आहे.
पीडित भारतीय वंशांचा बँकर
या प्रकरणातील फिर्यादीचे नाव जॉन डो (चिरायू राणा) असे आहे. ते भारतीय वंशाचे विवाहित बँकर आहेत, जे जेपीमॉर्गनच्या लिव्हरेज्ड फायनान्स विभागात एका कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होते. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, खटल्यातील आरोपानुसार, ३७ वर्षीय कार्यकारी संचालक लोर्ना हजदिनी यांनी आपल्या वरिष्ठ पदाचा वापर करून त्यांचा लैंगिक छळ केला आणि त्याच वेळी त्यांच्या पार्श्वभूमी, रूप आणि करिअरच्या संधींबद्दल वंशद्वेषी टिप्पण्या केल्या होत्या.
लॉर्ना हजदिनी यांच्यावर कर्मचाऱ्याचे आरोप
दाखल केलेल्या खटल्यानुसार, फिर्यादी आणि लॉर्ना हजदिनी यांच्यातील व्यावसायिक संबंधांचे रूपांतर बळजबरीच्या अनेक घटनांमध्ये झाले. कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या करिअरमधील प्रगतीला बाधा आणण्याची धमकी देण्यासाठी हजदिनी यांनी आपल्या पदाचा वापर केला, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
या खटल्यात फिर्यादीने केलेल्या आरोपांमध्ये लैंगिक बळजबरीच्या अनेक घटनांचा, तसेच ‘रूफीज’ (ज्यांना ‘डेट रेप ड्रग्ज’ म्हणूनही ओळखले जाते) या अंमली पदार्थाचे इंजेक्शन देण्याच्या आणि व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्यांसह अनेक अपमानकारक व वर्णद्वेषी शेरेबाजीच्या प्रसंगांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे.
माझ्या लैंगिक मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर…
दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर फिर्यादीने आपल्या लैंगिक मागण्या मान्य केल्या नाहीत, तर त्याची बढती रोखण्याची स्पष्ट धमकी हजदिनी यांनी दिली होती. “तू माझ्या मालकीचा आहेस! जर तू माझ्या लैंगिक मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मी तुला त्याची किंमत मोजायला लावीन”, असे हजदिनी यांनी फिर्यादीला म्हटल्याचे ‘डेली मेल’च्या एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत असा आरोप आहे की, हजदिनी यांनी तक्रारदाराचा छळ करण्यासाठी आणि त्याला शिवीगाळ करण्यासाठी वर्णद्वेषी भाषेचा वापर केला. त्या फिर्यादीला वारंवार म्हणायच्या की, त्याने सतत त्यांच्या बाजूने असले पाहिजे, अन्यथा व्यवस्थापन एका ‘ब्राऊन बॉय इंडियन’ला संघटनांचे नेतृत्व करण्यासाठी बढती देण्याचा विचार तरी का करेल.
लैंगिक कृत्ये करण्यासाठी फिर्यादीवर औधषांचा वापर
दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, लैंगिक कृत्ये करण्यासाठी फिर्यादीला त्याच्या संमतीशिवाय ‘लिंग ताठरता आणणारे औषधी द्रव्य’ (Erection Enabling Pharmaceutical Substance) देण्यात आले. फिर्यादीचा आरोप आहे की, या घटनांमुळे कामाच्या ठिकाणी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले, ज्यात छळाच्या वारंवार घटना घडल्या.
लॉर्ना हजदिनी कोण आहेत?
लॉर्ना हजदिनी या अमेरिकन बँकिंग क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीतील एक अनुभवी आणि दीर्घकाळ कार्यरत असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइल आणि न्यायालयीन कागदपत्रांनुसार, हजदिनी सध्या जेपीमॉर्गन चेसच्या लिव्हरेज्ड फायनान्स विभागात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हजदिनी जवळपास १५ वर्षांपासून जेपीमॉर्गनमध्ये आहेत आणि त्यांनी पूर्वी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे, ज्यामुळे त्यांना फार्मा, मेडटेक, लॉजिस्टिक्स आणि एरोस्पेस यांसारख्या क्षेत्रांचा अनुभव आहे.
त्यांनी एनवाययू स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस मधून फायनान्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आहे. तसेच, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमधून प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटलमधील एक अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
कंपनीने आरोप फेटाळले
या खटल्यानुसार, बँकेच्या लेव्हरेज्ड फायनान्स विभागात कथितरित्या २०२४ पासून गैरवर्तनाची एक पद्धतशीर मालिका सुरू आहे. पण, जेपी मॉर्गन चेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, अंतर्गत चौकशीत खटल्यातील दाव्यांना समर्थन देणारा कोणताही पुरावा आढळला नाही.
