Gold Price Forecast: सोन्याच्या किमतीने अलीकडे जोरदार उसळी घेतली असून भाव प्रति औंस ४६०० डॉलर्सच्या आसपास पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आता सोन्यात गुंतवणूक करावी की आणखी तेजीची वाट पाहावी हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे. जे.पी. मॉर्गन वेल्थ मॅनेजमेंटने सोन्याबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला असला तरी सध्याच्या पातळीवर काही काळ भाव स्थिर राहण्याची किंवा किंचित घसरण्याची शक्यता नाकारलेली नाही.

अमेरिकेतील व्याजदरांची पुढील दिशा आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे सध्या जागतिक बाजाराचे लक्ष आहे. ‘जॅक्सन होल’ येथील वार्षिक परिषदेत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे भाषण होणार असून, त्यातून व्याजदरांबाबत काही संकेत मिळतात का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरातील सोन्याच्या तेजीमुळे सध्याच्या उच्च पातळीवर खरेदी करणे योग्य आहे का, यावर बाजारात चर्चा सुरू झाली आहे.

सोन्याचा भाव ५००० डॉलर्सपर्यंत पोहोचणार?

जे.पी. मॉर्गन वेल्थ मॅनेजमेंटकडून सोन्याच्या किमतीबाबत दीर्घकालीन सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या मते, २०२६ च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति औंस ४५०० डॉलर्स आणि २०२७ च्या मध्यापर्यंत ५००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

मात्र, याचा अर्थ सोन्याचा भाव आतापासून सतत वाढतच राहील असे नाही. अलीकडील तेजीचा वेग पाहता पुढील काळात किमती काही प्रमाणात स्थिर होऊ शकतात किंवा त्यात तात्पुरती घसरणही होऊ शकते, असे जे.पी. मॉर्गनचे मत आहे.

सोन्याला कोणत्या गोष्टींचा आधार?

सोन्याच्या किमतीला सध्या अनेक आर्थिक आणि जागतिक घटकांचा आधार मिळत आहे. वास्तविक उत्पन्नातील बदल, अमेरिकन डॉलरची हालचाल, मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची (Gold) खरेदी आणि महागाईच्या अपेक्षा यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय वित्तीय व्यवस्था आणि आर्थिक धोरणांच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण होणारी चिंता देखील गुंतवणूकदारांना सोन्याकडे वळवू शकते.

जे.पी. मॉर्गन प्रायव्हेट बँकेतील आशियातील मॅक्रो स्ट्रॅटेजीचे प्रमुख युक्सुआन टँग यांच्या मते, सोन्यातील (Gold) अलीकडील तेजीमागे जुलै महिन्यातील फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक महत्त्वाची ठरली. या बैठकीनंतर भविष्यातील व्याजदरवाढीच्या अपेक्षा कमी झाल्या आणि चलनाच्या अवमूल्यनाबाबतची चिंता पुन्हा वाढली.

एवढ्या महाग सोन्यात आता गुंतवणूक करावी का?

सोन्याचा भाव विक्रमी किंवा त्याच्या आसपासच्या पातळीवर असताना नव्याने गुंतवणूक करणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे.पी. मॉर्गनच्या मते, सोन्याकडे (Gold) केवळ परतावा मिळवून देणारी मालमत्ता म्हणून पाहण्यापेक्षा पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी त्याचा वापर करणे अधिक योग्य ठरू शकते. यासाठी एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी सुमारे ५ टक्के हिस्सा सोन्यात ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. कारण सोन्याची किंमत नेहमीच वाढेल असे नाही.