Kotak-Mahindra Bank: कोटक महिंद्रा या खासगी क्षेत्रातील बँकेचे संस्थापक उदय कोटक यांना नुकतेच ‘पद्मभूषण’ पुरस्कारने गौरवण्यात आले होते. यानंतर उदय कोटक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो एक्स या सोशल मीडिया साईटवर शेअर केले होते.
यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी उदय कोटक यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांच्या सुरुवातीच्या भेटीची आठवण जागवली. आनंद महिंद्रा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, एका तरुण ‘एमबीए’ पदवीधराने एकेकाळी आपल्या कार्यालयात येऊन आर्थिक सेवांशी संबंधित एक कल्पना मांडली होती आणि पुढे याच कल्पनेचे रूपांतर भारतातील एका अत्यंत प्रतिष्ठित बँकिंग संस्थेत झाले आहे.
“उदय, हा क्षण आपल्या दोन्ही कुटुंबांसाठी अत्यंत विशेष आहे. मला तो क्षण कधीच विसरता येणार नाही, जेव्हा मी एका नुकत्याच पदवीधर झालेल्या ‘एमबीए’ तरुणाला भेटलो होतो. ज्याने आर्थिक सेवा क्षेत्रात उद्योजक बनण्याचे ठरवले होते आणि जो आमच्या कंपनीला ‘बिल डिस्काउंटिंग’ सुविधा देऊ करण्यासाठी माझ्या कार्यालयात आला होता”, असे आनंद महिंद्रा यांनी पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे.
“आर्थिक मध्यस्थीच्या क्षेत्रातील त्या एका छोट्याशा सुरुवातीपासून ते जगातील सर्वात आदरणीय बँकिंग तज्ज्ञांपैकी एक बनण्यापर्यंतचा हा प्रवास म्हणजे एक भव्य आणि प्रेरणादायी गाथाच आहे”, असे आनंद महिंद्रा पोस्टच्या शेवटी म्हणाले.
कोण आहेत उदय कोटक?
उदय कोटक यांनी १९८५ मध्ये केवळ १३ कर्मचाऱ्यांसह ३०० चौरस फुटांच्या कार्यालयात भारतातील तिसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी खाजगी बँक कोटक-महिंद्राची सुरुवात केली होती. मुंबईत जन्मलेल्या उदय कोटक यांचा कौटुंबीक कापड व्यवसाय होता. त्यामुळे आपल्या पारंपारिक व्यवसायात उदय कोटक यांनी नशिब आजमावले. पण, तिथे त्याचे मन रमले नाही. अखेर वयाच्या २६ व्या वर्षी कोटक यांनी स्मॉल फायनान्स बँक सुरू केली आणि ६० लाख रूपयांच्या गुंतवणूकीसह १९८५ साली कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेडची सुरूवात झाली.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे उदय कोटक यांचे चांगले मित्र होते. त्यांनी कोटक कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये गुंतवणूक केली. यानंतर कंपनीचे नाव बदलून कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड करण्यात आले.
२००३ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला खाजगी बँकिंग करण्यासाठी परवानगी दिली. महिंद्रा फायनान्स लिमिटेड खाजगी क्षेत्रात परवानगी मिळवणारी पहिली बँक होती. त्यानंतर अवघ्या ११ वर्षात यशाच्या पायऱ्या चढत कोटक महिंद्रा बँक देशातील दुसरी व्यावसायिक बँक ठरली. आज कोटक महिंद्र बँकेचे बाजार भांडवल ३.८७ लाख कोटी रुपये आहे.
