मुंबई: कर्जजर्जर बनलेल्या खासगी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कुमार मंगलम बिर्ला यांनी बुधवारपासून पदभार स्वीकारला. आर्थिक आणि स्पर्धात्मक आव्हानांना तोंड देत असताना, बिर्ला यांचे व्यवस्थापनांत परतणे हे प्रवर्तकांचा कंपनीला पाठिंबा कायम असल्याचे द्योतक मानले जात आहे.

नुकतेच ‘एजीआर’ थकबाकीत कपातीचा दिलासा मिळालेल्या कंपनीच्या भागधारकांसाठीही हे शुभसूचक ठरले. कर्जबाजारी असलेल्या या दूरसंचार कंपनीसाठी हा नेतृत्वबदल महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे. कंपनीने आगामी काळात निधी उभारणी, नेटवर्कमधील गुंतवणुकीला गती आणि कामकाज स्थिर करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये, केंद्र सरकारला कंपनीत मालकी हिस्सा प्रदान करताना, कुमार मंगलम बिर्ला यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

व्होडाफोन आयडिया सुमारे २५,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने याआधी २०२४ मध्ये फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे (एफपीओ) १८,००० कोटी रुपये उभारले होते. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांसारख्या मोठ्या स्पर्धकांशी सामना करण्यासाठी कंपनीकडून, ४जी क्षमता वाढवण्यासाठी आणि ५जी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एजीआर सवलतीमुळे ताण कमी

दूरसंचार विभागाने व्होडाफोन आयडियाच्या समायोजित एकूण महसूल (एजीआर) थकबाकीचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर हा आणखी सकारात्मक बदल झाला आहे, सरकारच्या निर्णयामुळे कंपनीचे दायित्व कमी झाले असून, आगामी निधी उभारणीच्या प्रयत्नांनाही अधिक बळ मिळणार आहे. मात्र सवलतीचा दिलासा मिळूनही, कंपनीवर अजूनही मोठी देणी कायम आहेत. यामुळे नजीकच्या काळात रोख प्रवाहावर ताण कायम राहण्याची शक्यता आहे.

बाजार भांडवलात ५,४०० कोटींची भर

बुधवारच्या सत्रात व्होडाफोन आयडियाचा समभाग ४.६३ टक्क्यांनी वधारून ११.३० रुपयांवर स्थिरावला. सत्रादरम्यान, ५.८३ टक्क्यांची उसळी घेत समभागाने ११.४३ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. परिणामी कंपनीच्या बाजार भांडवलात ५,४१७.१६ कोटी रुपयांची भर पडली आणि ते १,२२,४२७.६३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.