Lalit Modi Net Worth Income Sources Property Breakdown: आयपीएलचे माजी कमिशनर आणि उद्योगपती ललित मोदी त्यांच्यावर लागलेल्या ‘फरार’ या शिक्क्याचा नेहमीच विरोध करत आले आहेत. आता सुद्धा एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ललित मोदी यांनी आपण फरार नसून, आपल्याविरोधातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचे म्हटले आहे. ललित मोदी २०१० मध्ये देश सोडून इंग्लंडला गेले आहेत. तेव्हापासून ते तेथे वास्तव्यास आहेत. तसेच या ना त्या कारणाने ते सातत्याने चर्चेत असतात. आता नव्या मुलाखतीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यामुळे ललित मोदी यांचे व्यवसाय काय आहेत? त्यांची संपत्ती किती आहे? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
भारतात असताना ललित मोदी यांनी एक उत्तम क्रिकेट प्रशासक म्हणून नाव कमावले होते. त्यांच्या पुढाकारानेच २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेची सुरुवात झाली होती, जी सध्या जगातील सर्वात महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाते. २०१० मध्ये बीसीसीआयने ललित मोदी यांना निलंबित केले आणि २०१३ मध्ये त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. पण या गोष्टींचा ललित मोदी यांच्या जीवनशैलीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. २०१० पासून ते लंडनमध्ये वास्तव्यास असून आपल्या आलिशान जीवनशैलीमुळे अधूनमधून ते चर्चेत येत असतात.
ललित मोदी यांची संपत्ती
आज तक आणि GQ India च्या वृत्तांनुसार, ललित मोदी यांची एकूण संपत्ती अंदाजे ४५५५ कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. ही प्रचंड संपत्ती त्यांनी मोदी एंटरप्राइजेसमधील आपल्या वारसाहक्काने मिळालेल्या हिश्श्यातून, आयपीएलच्या प्रमुखपदी असतानाच्या कार्यकाळातून आणि युनायटेड किंगडममधील त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीतून निर्माण केली आहे.
ललित मोदी सध्या लंडनच्या चेल्सी भागातील स्लोन स्ट्रीटवरील एका पाच मजली आलिशान हवेलीत राहतात. एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, ही मालमत्ता ७००० चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेली असून यात १४ खोल्या, आठ दुहेरी बेडरूम्स, सात स्नानगृहे, चार स्वागत कक्ष, दोन स्वयंपाकघरे आणि एक अंतर्गत लिफ्ट यांचा समावेश आहे. मोदींनी दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर घेण्यापूर्वी, या मालमत्तेचे भाडे दरमहा १२ लाख रुपये असल्याचे सांगितले जात होते.

ललित मोदी यांचे व्यावसाय
ललित मोदी यांची व्यावसायिक पार्श्वभूमी मात्र अधिक गुंतागुंतीची आहे. आज तकच्या वृत्तानुसार, त्यांचे आजोबा गुजरमल मोदी यांनी १९३३ मध्ये स्थापन केलेल्या मोदी एंटरप्राइजेस या कौटुंबिक उद्योग समूहाचे मूल्य १२००० कोटी रुपयांहून अधिक आहे.
लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या समूहातील शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली प्रमुख कंपनी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, जी भारतात मार्लबोरो आणि बेन्सन अँड हेजेस या ब्रँड्सचे उत्पादन करते, तिने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ११२७१ कोटी रुपयांची एकूण विक्री आणि ८८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
वाटणी आणि कौटुंबिक वाद
या व्यावसायिक साम्राज्यातील ललित मोदींच्या हिश्श्याबाबत अजूनही कायदेशीर वाद सुरू आहे. २०१९ मध्ये कुटुंबाचे प्रमुख के.के. मोदी यांचे निधन झाल्यानंतर, के.के. मोदी फॅमिली ट्रस्ट संदर्भात ललित मोदी हे त्यांची आई बीना मोदी आणि बहीण चारू मोदी यांच्याशी सुरू असलेल्या एका दीर्घकालीन कायदेशीर लढाईत अडकले आहेत. या प्रकरणावरील वृत्तांकनानुसार, भारताच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या वादाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे गॉडफ्रे फिलिप्सचे नियंत्रण आणि सुमारे ११००० कोटी रुपयांच्या कौटुंबिक मालमत्तेची वाटणी हा आहे.
वारस
जानेवारी २०२३ मध्ये, ललित मोदी यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, त्यांनी के.के. मोदी फॅमिली ट्रस्टमध्ये मुलगा रुचिरला आपला वारसदार म्हणून घोषित केले आहे.
