Success Story Of Leena Nair And Achievements As Chanel CEO Kolhapur: कोल्हापूरसारख्या एका छोट्या शहरातून सुरू झालेला प्रवास आणि थेट पॅरिसमधील जागतिक स्तरावरील फॅशन ब्रँड ‘शनेल’च्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारणाऱ्या लीना नायर यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

११ जून १९६९ रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या लीना नायर यांनी होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले. त्या काळात जवळ कॉलेज नसल्यामुळे त्या रोज सायकलवरून १२ किलोमीटर प्रवास करून कॉलेजला जायच्या. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतले. सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या त्या कॉलेजमध्ये केवळ १८ मुली शिकत होत्या. पुरुषांच्या क्षेत्रात वावरण्याचा हा अनुभव त्यांच्या पुढील करिअरचा पाया ठरला. पुढे त्यांनी जमशेदपूरच्या एक्सएलआरआयमधून ‘ह्युमन रिसोर्सेस’मध्ये सुवर्णपदकासह पदवी पूर्ण केली.

हिंदुस्तान युनिलिव्हरमधील ऐतिहासिक पावले

१९९२ मध्ये लीना नायर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये रुजू झाल्या. १९९० च्या दशकात कारखान्यांमध्ये महिलांसाठी नाईट शिफ्ट किंवा साधी शौचालयेदेखील नव्हती. अशा प्रतिकूल वातावरणात त्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेले नियम मोडून काढले. स्वतः नाईट शिफ्ट करत त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या पहिल्या महिला फॅक्टरी फ्लोअर मॅनेजर होण्याचा मान मिळवला.

नवीन कारखान्यांमध्ये महिलांसाठी शौचालये बांधून घेणे हे त्यांच्या प्राथमिक कामांपैकी एक असे. या कार्यतत्परतेमुळे सहकारी त्यांना प्रेमाने “लीनाची शौचालये” असे म्हणत. आपल्या ३० वर्षांच्या हिंदुस्तान युनिलिव्हरमधील कारकिर्दीत त्यांनी महिला व्यवस्थापकांचे प्रमाण ३८% वरून ५०% पर्यंत नेले आणि कंपनीच्या इतिहासातील सर्वात तरुण ‘चीफ एचआर ऑफिसर’ बनल्या.

शनेलच्या जागतिक सीईओ पदापर्यंतचा पल्ला

डिसेंबर २०२१ मध्ये, प्रसिद्ध फॅशन ब्रँड शनेलचे अध्यक्ष अलेन वर्थायमर यांनी लीना नायर यांना आपल्या कंपनीच्या ग्लोबल सीईओ पदाची धुरा सांभाळण्यासाठी निवडले. जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. ११५ वर्षे जुन्या या फ्रेंच लक्झरी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या. फॅशन क्षेत्राबाहेरून येऊनही त्यांनी आपल्या एचआर आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर या प्रतिष्ठित ब्रँडला मोठे यश मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली शनेलमध्ये ६० टक्क्यांहून अधिक व्यवस्थापन पदे महिलांकडे आहेत.

“प्रगती करत असताना इतरांनाही सोबत घेऊन पुढे जाणे आणि माझ्या नंतर येणाऱ्यांसाठी मार्ग सुकर करणे, हीच माझी प्रेरणा आहे”, असे मानणाऱ्या लीना नायर यांनी हे सिद्ध केले आहे की, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही उच्च शिखर सर करता येते.