Lenskart Controversy : प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘ग्रूमिंग आणि युनिफॉर्म’ धोरणावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमुळे कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप केला जात आहे. अखेर या प्रकरणावर संस्थापक पीयूष बन्सल यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

लेन्सकार्टमध्ये नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या ‘स्टाईल गाईड’मधील ११ व्या पानाचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. लेखिका शेफाली वैद्य यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानुसार, लेन्सकार्टच्या नियमावलीत कर्मचाऱ्यांना ‘हिजाब’ घालण्याची परवानगी आहे. मात्र, कपाळावर ‘बिंदी’ (टिकली), ‘टिळक’ किंवा हातात दोरा बांधण्यास मनाई करण्यात आली आहे.

शेफाली वैद्य यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “हे नियम अधिकृत असल्याची मी खात्री केली आहे. पीयूष बन्सल आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात की हिजाब ठीक आहे, पण बिंदी/टिळक/कलावा चालणार नाही. ज्या देशात बहुसंख्य ग्राहक आणि कर्मचारी हिंदू आहेत, तिथे अशा प्रकारचे दुटप्पी निकष का?”

नेटकऱ्यांकडून बहिष्काराचे आवाहन

हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लेन्सकार्ट’चा ट्रेंड सुरू झाला. अनेक युजर्सनी कंपनीवर भेदभाव केल्याचा आरोप केला. एका युजरने लिहिले की, “हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू किंवा टिकली लावण्यापासून रोखणे आणि हिजाबला परवानगी देणे हा दुटप्पीपणा आहे.” तर दुसऱ्या एका युजरने, “आम्ही यापुढे लेन्सकार्टकडून कधीही चष्मे खरेदी करणार नाही,” असे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला.

संस्थापक पीयूष बन्सल यांचे स्पष्टीकरण

वाढता वाद आणि ग्राहकांचा रोष पाहता, लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, जो दस्तऐवज व्हायरल होत आहे, तो कंपनीचे सध्याचे धोरण दर्शवत नाही.
बन्सल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “लेन्सकार्टच्या ज्या पॉलिसी डॉक्युमेंटचा फोटो व्हायरल होत आहे, तो चुकीचा आहे. आमच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत. कर्मचारी बिंदी आणि टिळक अभिमानाने लावू शकतात. आमचे ग्रूमिंग धोरण काळानुसार बदलले आहे आणि जुन्या आवृत्त्या आता लागू नाहीत.”

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “या गोंधळामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो. आम्ही चुकांमधून शिकत आहोत. लेन्सकार्ट हे भारतात भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले स्टार्टअप आहे. आमच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा आम्ही नेहमीच आदर करू आणि त्याबाबत कधीही तडजोड करणार नाही.”

पाच महिन्यांपूर्वीच लेन्सकार्टचा आयपीओ बाजारात

वादात सापडलेल्या लेन्सकार्टचा आयपीओ १० नोव्हेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात कमकुवत लिस्टिंगसह सुरू झाला. ४०२ रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर बीएसईवर ३९० रुपयांवर (सुमारे ३% सवलत) सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांची निराशा झाली. पण, नंतर शेअरमध्ये चांगली वाढ झाली आहे. आज गुरुवारी शेअर ५३४ रुपयांवर व्यवहार करत आहे.