वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने भांडवली बाजारात वाहणाऱ्या वाऱ्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर विश्वास ठेवत त्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गेल्या काही सत्रात भारतीय आयटी कंपन्यांना जागतिक पातळीवरील एआयच्या वाढत्या प्रभावाचा स्पर्धात्मकरित्या सामना करावा लागण्याच्या शक्यतेने घसरण झाली. यामुळे अनेक गुंतवणूकदार आयटी क्षेत्रातील समभागांची विक्री करून बाहेर पडत आहेत. प्राईम डेटाबेसच्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार असलेल्या एलआयसीने, भांडवली बाजारातील सूचिबद्ध असलेल्या २८३ कंपन्यांमध्ये सुमारे १७.८३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

डिसेंबर तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) सुमारे ३,१३६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केली. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे २,२९३ कोटी रुपये आणि कोफोर्जला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान दिले आहे. खरेदीच्या या वेगामुळे एलआयसीचे आयटी क्षेत्रातील गुंतवणूक फक्त तीन महिन्यांत १.८२ लाख कोटी रुपयांवरून २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

आयटी समभाग त्यांच्या उच्चांकी पातळीवरून ३० टक्क्यांपर्यंत घसरले असले तरी, पोर्टफोलिओमधील या क्षेत्राचा वाटा ११.३२ टक्क्यांवरून १२.४३ टक्क्यांपर्यंत वाढला. एलआयसीचे हे पाऊल व्यापक बाजारातील भावनांशी अगदी विसंगत आहे, जिथे एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आयटी क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी समभाग विक्री केली आहे.

बँका आणि वित्तीय क्षेत्रांना फटका

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग खरेदी करताना, एलआयसीने आक्रमकपणे वित्तीय सेवा कंपन्यांचे समभाग विकले. स्टेट बँकच्या ३,०८० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक १,५२८ कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाचे १,१७३ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले. एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील वित्तीय सेवांचा वाटा २७.२१ टक्क्यांवरून २६.५२ टक्क्यांपर्यंत घसरला.

औद्योगिक आणि धातू क्षेत्रातही विक्री

एलआयसीने भारतातील औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी केली आहे, लार्सन अँड टुब्रोचे (एल अँड टी) २,४४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग आणि रिलायन्स इंडस्ट्री २,३६७ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. धातू क्षेत्रात हिंडाल्को २,३०७ कोटी रुपये, वेदांतामध्ये १,४९१ कोटी रुपये आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामधील देखील हिस्सेदारी कमी केली आहे, धातू क्षेत्रातील एलआयसीचा हिस्सा १० टक्क्यांवरून ९.१८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.