मुंबई : सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने सरलेल्या डिसेंबरअखेर तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १७ टक्क्यांची वाढ नोंदवत तो १२,९५८ कोटी रुपयांवर नेल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, एलआयसीने मागील वर्षी याच कालावधीत ११,०५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीतील १,०६,८९१ कोटी रुपयांवरून वाढून १,२५,६१३ कोटी रुपयांवर पोहोचले. एकूण उत्पन्नही डिसेंबर तिमाहीत २,३३,९८४ कोटी रुपयांपर्यंत वधारले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत २,०१,९९४ कोटी रुपये होते.
विमा कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील ५,९६६ कोटी रुपयांच्या तुलनेत ६,०११ कोटी रुपयांचे निव्वळ कमिशन दिले. नवीन व्यवसायाच्या बाबतीत, एलआयसीने मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ७,२८५ कोटी रुपयांच्या तुलनेत १०,६०५ कोटी रुपयांचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम मिळवला आहे.
मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात एलआयसीचा समभाग ४.४५ रुपयांनी वधारून ८३९.७५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे ५.३१ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.

