LPG New Connection : पश्चिम आशियात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षाचे चटके आता भारतीयांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहे. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. केवळ नवीन कनेक्शनच नाही, तर सध्याच्या ग्राहकांना ‘दुसरा सिलेंडर’ देण्यावरही अघोषित निर्बंध लादण्यात आले आहेत.
एलपीजी आयातीचे गणित बिघडले
भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६५% एलपीजी आयात करतो. यातील बहुतांश पुरवठा सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या आखाती देशांतून होतो. मात्र, युद्धाच्या धोक्यामुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा मुख्य सागरी मार्ग प्रभावित झाला आहे. ज्या सागरी मार्गातून नियमित १०० जहाजे प्रवास करत होती, ती संख्या आता ३ ते ४ वर आल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. एप्रिल २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या एलपीजी वापरात मार्च महिन्यात सुमारे १३ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
एलपीजी वापराबाबत नवीन नियम काय?
- गेल्या महिनाभरापासून तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देणे थांबवले आहे. पुणे आणि पाटणा यांसारख्या शहरांत वितरकांना तोंडी आदेश देऊन नवे कनेक्शन न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सध्या उपलब्ध असलेला साठा हा केवळ नियमित घरगुती ग्राहकांसाठीच राखीव ठेवला जात आहे. ज्या ग्राहकांकडे एकच सिलेंडर आहे, त्यांना वेळेवर रिफिल मिळावे, यासाठी कंपन्यांनी ‘दुसरा सिलेंडर’ देण्यावर बंदी घातली आहे.
- हॉटेल आणि उद्योगांसाठीच्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यात तब्बल ४८ ते ७० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे, जेणेकरून घरगुती स्वयंपाकाचा गॅसचा पुरवठा सुरळीत राहील.
पेट्रोकेमिकल्सकडून एलपीजीकडे
पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत रिफायनरींना पेट्रोकेमिकल उत्पादन कमी करून एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही, वाढती मागणी आणि आयातीतील अडथळे पाहता परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.
कोणासाठी अडचणीचे?
जे लोक नवीन घरात शिफ्ट होत आहेत किंवा ग्रामीण भागात प्रथमच गॅस घेऊ इच्छितात, त्यांना आता परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होत असून, बाहेर जेवणे महागण्याची शक्यता आहे. सरकार आता ग्राहकांना एलपीजी ऐवजी पाईप्ड नॅचरल गॅसकडे वळण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरून सिलेंडर्सवरील ताण कमी होईल.
