LPG Cylinder Price : पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थी, बॅचलर्स लोकांची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. आज सकाळी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाल्याची बातमी ताजी असतानाच, आता ५ किलोच्या सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एलपीजीच्या टंचाईमुळे घरगुती वापराच्या छोट्या सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. म्हणजे आता खोलीवर जेवण बनवणे महाग होणार असून यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडू शकते.
‘छोटू’ सिलिंडरच्या दरात ऐतिहासिक वाढ
५ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत एकाच वेळी तब्बल २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जो सिलिंडर कालपर्यंत ५४९ रुपयांमध्ये मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८१० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्येही ९९३ रुपयांची वाढ झाली असून, दिल्लीत याचे दर आता ३,०७१.५० रुपयांवर पोहोचले आहेत.
मजूर आणि विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले
या दरवाढीचा सर्वाधिक फटका समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसणार आहे. परराज्यात मजुरीसाठी गेलेले कामगार आणि ज्यांचे राहण्याचे ठिकाण निश्चित नाही, असे लोक प्रामुख्याने ५ किलोच्या सिलिंडरवर अवलंबून असतात. तसेच शिक्षणासाठी शहरात भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मासिक खर्चात आता मोठी वाढ होणार आहे. रस्त्यावरील छोटे दुकानदार, टपरीवाले आणि ढाबा चालकांसाठी आता व्यवसाय करणे कठीण झाले आहे. याची झळ ग्राहकांना बसल्याशिवाय राहणार नाही.
परिस्थिती आणखी बिघडणार
गॅसच्या किमती वाढण्यामागे जागतिक भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या महागाईमुळे दिल्ली, मुंबई आणि सुरत सारख्या शहरांमधून स्थलांतरित मजुरांचे पलायन आधीच सुरू झाले असून, ताज्या दरवाढीमुळे ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
घरगुती सिलिंडरचे दर स्थिर
मध्य पूर्वेत संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर घरगुती एलपीजीच्या दरामध्ये यापूर्वीच ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, परिस्थिती अशीच राहिली तर घरगुती गॅस सिलिंडरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
