पीटीआय, नवी दिल्ली

सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी वाणिज्य वापराच्या एलपीजीमध्ये महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ केल्यानंतर देशभरात त्याच्या किमती प्रति सिलिंडर दोन हजारांपुढे गेल्या आहेत. मात्र घरगुती वापराच्या एलपीजीमध्ये दरवाढ केली न गेल्याने तेल विपणन कंपन्यांना प्रति सिलिंडर ३८० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या गेल्यामुळे त्यांना होणारे नुकसान आणखी मोठे आहे.

घरगुती वापराच्या एलपीजीच्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत गेल्या महिन्यात म्हणजेच ७ मार्च रोजी ६० रुपयांनी दरवाढ करण्यात आली. तरी तेल विपणन कंपन्यांना प्रति सिलिंडर ३८० रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी दिली. मे महिन्याच्या अखेरीस हा संचयी तोटा अंदाजे ४०,४८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही, त्यांना यात एकूण ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. या तोट्यापैकी, ३०,००० कोटी रुपयांचा भार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी उचलला, तर उर्वरित ३०,००० कोटी रुपयांची भरपाई सरकारकडून केली गेली. नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीच्या वाढत्या किमतींच्या झळांपासून वाचवण्यासाठी हे करण्यात आले.

…तर डिझेल लिटरमागे १९५ रुपयांवर

तेल विपणन कंपन्यांना वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याची परवानगी दिली गेली, तर मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १९५.०२ रुपयांपर्यंत आणि पेट्रोलचे दर १२७.९४ रुपयांपर्यंत वाढू शकतात. १ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, तेल विपणन कंपन्यांना स्वस्तात कराव्या लागत असलेल्या इंधन विक्रीमुळे, पेट्रोलमागे प्रति लिटर २४.४० रुपये आणि डिझेलमागे प्रति लिटर १०४.९९ रुपयांचे नुकसान होत आहे. आयात खर्च वाढूनही, त्यातुलनेत होत असलेली ही स्वस्तातील विक्री पाहता, सरकारी तेल कंपन्यांची ‘अंडर-रिकव्हरी’ वाढत आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता, दरवाढीसारख्या मतांच्या दृष्टीने संवेदनशील निर्णय अधिकाधिक पुढे ढकलला जाणे केंद्रातील सरकारसाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचा जरी असला तरी कंपन्यांना ते आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्यात गेल्या जवळपास दोन वर्षात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. या आधी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, १४ मार्च २०२४ रोजी पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर २ रुपयांची कपात झाली होती.

भारतात सर्वात स्वस्त गॅस

देशात घरगुती एलपीजी किंमत ही जगातील सर्वात कमी किमतींपैकी एक असून या तुलनेत पाकिस्तानमध्ये ही किंमत १,०४६ रुपये, श्रीलंकेत १,२४२ रुपये आणि नेपाळमध्ये १,२०८ रुपये इतकी आहे.