LPG Cylinder Price Hike : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ आहे. यापूर्वी चालू वर्षात ७ मार्च २०२६ रोजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. भविष्यात सिलिंडरच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, ताज्या दरवाढीनंतरही सरकारी तेल विपणन कंपन्यांना प्रति सिलिंडर तब्बल ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

सिलिंडरच्या किमतीत का होतेय वाढ?

आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीसाठी बेंचमार्क मानल्या जाणाऱ्या ‘सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईज’मध्ये २८ फेब्रुवारीपासून तब्बल ४६ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भारतात एका घरगुती सिलिंडरचा पुरवठा करण्याचा प्रत्यक्ष खर्च आता १६०० रुपयांच्या पार गेला आहे. याचा फटका यापूर्वीच १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरला बसला आहे. मध्यपूर्वेतील संकटानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पाच वेळा वाढ करण्यात आली असून, सध्या दिल्लीत हा सिलिंडर ३,११३.५० रुपयांना म्हणजेच सुमारे १६४ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

घरगुती सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

नवीन सुधारित दर ७ जूनपासून देशभरात लागू झाले असून, यामुळे दिल्लीत सामान्य ग्राहकांसाठी घरगुती सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थी कुटुंबांसाठी हा दर ६४२ रुपये इतका असेल. आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार करता उज्ज्वला योजनेच्या पहिल्या चार सिलिंडरवर ग्राहकांना तब्बल ६० टक्के सवलत मिळत आहे, तर सामान्य बिगर उज्ज्वला ग्राहकांना मिळणारा ९४२ रुपयांचा सिलिंडर हा मूळ जागतिक किमतीपेक्षा ४५ टक्के सवलतीत दिला जात आहे.

सर्वसामान्यांसाठी चौफेर महागाई

गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत घरगुती एलपीजीवरील ही एकूण तूट आधीच्या वर्षातील १,३३८ कोटी रुपयांवरून थेट ६०,००० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. तेल कंपन्यांचे हे प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपन्यांना ३०,००० कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. एलपीजीच्या या दरवाढीपूर्वी देशात मे महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर एकूण ७.५० रुपयांची वाढ झाली आहे, तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचे दरही प्रति किलो सुमारे ६ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण इंधन कडाका सर्वसामान्यांचे बजेट कोलमडवणारा ठरत आहे.

भविष्यात LPG चे दर आणखी किती वाढणार?

इराण-अमेरिका यांच्यात शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटली आहे. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले. प्रत्युत्तरात इस्त्रायलने ड्रोन हल्ले चढवले. त्यामुळे युद्धविराम होण्याची शक्यता मावळली आहे. भारताच्या एकूण एलपीजी वापरापैकी तब्बल ५४ टक्के गॅसची आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते. या सागरी मार्गातील अडथळ्यांमुळे भारताची एकूण स्वयंपाक गॅसची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. तेल कंपन्या सध्या प्रत्येक सिलिंडरमागे ७०० रुपये तोटा सहन करत आहे. त्यामुळे आगामी काळात हा तोटा भरुन काढण्यासाठी आणखी दर वाढवले जाऊ शकतात.