Dr Shriram Nene Investment In GOQii:अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोग्यविषयक बाबींवर भाष्य करत असतात. अमेरिकेत काही वर्षे आरोग्य क्षेत्रात काम केल्यानंतर ते भारतात परतले आहेत. डॉ. नेने सध्या ‘GOQii’ या कंपनीमध्ये गुंतवणूकदार आहेत. GOQii ही आरोग्यसेवा आणि फिटनेस कंपनी आहे. चला, या कंपनीबद्दल जाणून घेऊया.

GOQii विषयी

GOQii च्या संकेतस्थळानुसार, कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे असून, मुंबई आणि शेन्झेन येथेही त्यांची कार्यालये आहेत. प्रगत वेअरेबल तंत्रज्ञान, जगातील आघाडीचे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक (कोचेस) यांच्या माध्यमातून लोकांना निरोगी जीवनशैलीकडे कायमस्वरूपी घेऊन जाणे हे कंपनीचे ध्येय आहे.

GOQii मध्ये जगातील काही आघाडीच्या तज्ज्ञांचा आणि उत्कृष्ट व्यवस्थापकांचा समावेश आहे. निरोगी व शाश्वत जीवनशैलीविषयीच्या उत्कटतेने प्रेरित असलेल्या या मंडळींचा असा ठाम विश्वास आहे की, आपल्यापैकी प्रत्येकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली आहे. जगभरातील लक्षावधी लोकांना त्यांची क्षमता जागृत करण्यास मदत करून, त्यांना स्वतःच एक ‘सकारात्मक शक्ती’ बनण्यासाठी सक्षम करणे हे GOQii चे मुख्य उद्दिष्ट आहे.

GOQii मध्ये कोणा-कोणाची गुंतवणूक आहे?

GOQii ला आघाडीच्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश आहे:

अमित सिंघल (गुगलचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष)

अनिल गोधवानी (हॅबिटेरा)

भरत वासन (मायबेसिस)

डॉ. श्रीराम नेने

एस्थर डायसन

गौतम गोधवानी (सिंपली हायर्ड)

कंवलजीत बॉम्बरा (डेल)

माधुरी दीक्षित-नेने (बॉलिवूड अभिनेत्री)

माइक मॅकनामारा (फ्लेक्सट्रॉनिक्स)

प्रशांत गुलाटी (टीई)

संजय पार्थसारथी (इंडिक्स)

संजय वासवानी

स्टीव्ह लुझो (सेगेट)

ताहेर खोराकीवाला (मायक्रोसॉफ्ट)

विजय वाशी (मायक्रोसॉफ्ट)

कोण आहेत डॉ. श्रीराम नेने?

डॉ. श्रीराम नेने यांचा जन्म लंडनमध्ये झाला आणि ते अमेरिकेत लहानाचे मोठे झाले. महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी ते एक सॉफ्टवेअर उद्योजक होते. त्यांनी सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे, जिथे त्यांनी १९९३ मध्ये ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ (MD) ही पदवीही मिळवली. त्यानंतर त्यांनी लॉस एंजेलिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये जनरल सर्जरीचे प्रशिक्षण घेतले आणि व्हॅस्क्युलर सर्जिकल रिसर्च फेलोशिप पूर्ण केली.

अखेरीस त्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरीमधील फेलोशिपसह आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी अमेरिकेत थोरॅसिक आणि जनरल सर्जरीमध्ये ‘बोर्ड सर्टिफिकेशन’ मिळवले आणि डेन्व्हर, कोलोरॅडो येथे हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक (सर्जन) म्हणून काम केले. २०११ मध्ये ते भारतात स्थायिक झाले.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती

डॉ. श्रीराम नेने कार्डिओव्हस्कुलर सर्जन आहेत. ते अमेरिकेतील सर्वात यशस्वी हार्ट सर्जन होते. अमेरिकेत बरीच वर्षे काम केल्यानंतर ते माधुरीबरोबर भारतात स्थायिक झाले आहेत. सध्या ते भारतातील आरोग्य क्षेत्रात ते काम करत आहेत. डॉ. श्रीराम नेने यांना लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे आलिशान कार्सचे कलेक्शन आहे. डॉ. नेने यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास ते जवळपास १०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. डीएनएच्या वृत्तानुसार, ते एका महिन्यात सात लाख रुपयांहून जास्त कमाई करतात. माधुरी दीक्षित पतीपेक्षा जास्त श्रीमंत आहे. दोघांची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे.