Madhuri Jain Grover Statement on Poverty: ‘लॉक अप’ या रिअ‍ॅलिटी शोचा दुसरा सीझन सतत चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात उद्योगपती अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी आणि स्पर्धक माधुरी जैन ग्रोव्हर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोष्ट सांगितली आहे. ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

माधुरी यांनी सांगितले की, त्यांना आणि त्यांचे पती अशनीर यांना तिसरे मूल हवे होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी याला विरोध केल्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला. या कार्यक्रमात त्या असे म्हणताना ऐकू आले की, “तिसरे मूल तुम्हाला तरुण ठेवते. तुम्ही शाहरुख खानसह सर्व श्रीमंत लोकांना पाहिले तर, त्यांना तिसरे मूल आहे. ‘हम दो हमारे दो’ ही संकल्पना सर्वांना लागू होत नाही. श्रीमंत लोक जितकी मुले जन्माला घालतील तितकी श्रीमंती वाढेल आणि गरीब जन्माला घालतील तर गरिबी वाढेल.”

माधुरी यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर एकाने त्यांच्या विचारसरणीवर कठोर शब्दांत टीका केली आणि लिहिले, “माधुरी अशनीर ग्रोव्हर यांची ही वृत्ती अत्यंत निंदनीय आणि उच्चभ्रू अहंकाराचे कुरूप प्रदर्शन आहे. यात माणसांची किंमत केवळ त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरवली जात आहे आणि प्रतिष्ठा, कुटुंब व अपत्यप्राप्तीचा अधिकार केवळ श्रीमंतांचाच आहे, असे सुचवले जात आहे. म्हणजेच, श्रीमंतांकडून होणारे शोषण ही कधीच समस्या नसते, तर गरिबांचे अस्तित्व हीच समस्या मानली जाते.”

आणखी एका युजरने म्हटले, “मॅडम मुळात आर्थिक विषमता का आहे? कारण ही व्यवस्थाच श्रीमंतांच्या फायद्याची व्हावी अशी बनवली गेली आहे. माहितीसाठी सांगतो की, श्रीमंत लोक खूप जास्त प्रमाणात उपभोग घेतात.”

कोण आहेत अशनीर ग्रोव्हर?

उद्योगपती अशनीर ग्रोव्हर हे भारतीय फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह-संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी २०१८ मध्ये शाश्वत नाकराणी आणि भाविक कोलाडिया यांच्यासोबत या कंपनीची सह-स्थापना केली होती. याचबरोबर ‘शार्क टँक इंडिया’ नावाच्या रिॲलिटी टीव्ही शोमध्ये ते परीक्षक आणि गुंतवणूकदार म्हणूनही सहभागी झाले होते.

१४ जून १९८२ रोजी दिल्लीत जन्मलेल्या अशनीर ग्रोवर यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते आणि आई शिक्षिका. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी टेक पदवी प्राप्त मिळवली आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले आहे.