मुंबई : जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि उद्योजकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाबिझ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय संमेलन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय उद्योजकांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठ मिळावे यासाठी जीएमबीएफने दुबईत नवव्या महाबिझ २०२६ या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचे आयोजन केले

संमेलनाचा पहिला दिवस ३१ जानेवारी २०२६ रोजी Al Habtoor Polo Resort, Dubai येथे होणार असून, यामध्ये संरचित नेटवर्किंग, विविध उद्योग क्षेत्रांवरील सत्रे तसेच भारत, यूएई व आफ्रिकेतील उदयोन्मुख व्यावसायिक संधींवर चर्चा होणार आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी Atlantis, The Palm, Dubai येथे होणाऱ्या दुसऱ्या दिवशी ‘महाबिझ २०२६’चे औपचारिक उद्घाटन, मान्यवरांची की-नोट भाषणे, जागतिक ब्रँड सादरीकरणे आणि ‘महाराष्ट्र इन दुबई’ हा भव्य समारोप कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

याबाबत बोलताना ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जीएमबीएफ) ग्लोबल दुबई, यूएईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर म्हणाले की, महाबिझ २०२६ चे वेळापत्रक अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आखण्यात आले असून, यातून उद्योग, उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष व्यावसायिक लाभ मिळेल, हा ठाम विश्वास आहे. जगभरातून २६ देशांतील मान्यवर उद्योगपतींची या उपस्थिती उद्योग संमेलनाला लाभणार असून, महाराष्ट्रासाठी / महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी हे विश्वसंमेलन विशेष ठरणार आहे.”

याबाबत बोलताना श्रीपाद कुलकर्णी, संस्थापक व अध्यक्ष – BBNG (महा बिझ २०२६ आयोजक) म्हणाले, महा बिझ २०२६ म्हणजे केवळ परिषद नाही, तर संपर्कांचे रूपांतर प्रत्यक्ष करार, गुंतवणूक आणि दीर्घकालीन भागीदारीत करणारा जागतिक मंच आहे. महाराष्ट्रातील नवउद्योजकांचा दुबईत प्रवेश सुकर व्हावा यासाठी कॉन्टॅक्ट टू कॉन्ट्रॅक्ट अर्थात संपर्कातून थेट कार्यदेश या संकल्पनेवर यंदाचे अधिवेधन बेतलेले आहे.

महाबिझ २०२६ हे महाराष्ट्र व भारतासाठी जागतिक व्यापाराच्या नव्या दालानांची दारे उघडणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरातील उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक, आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजकांना या जागतिक मंचाशी थेट जोडण्याची संधी मिळणार आहे. नवउद्यमींना आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील व्यावसायिकांना आखाती देशांसह आफ्रिकन बाजारपेठांपर्यंत पोहोचता येईल.