विजय शेट्टी

Maharashtra MSME sector is the backbone of the state’s journey toward a 1 trillion dollar economy: महाराष्ट्र दिन आपल्याला भारताच्या आर्थिक प्रगतीला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रवासाकडे पुन्हा पाहण्याची संधी देतो. राज्य एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, पुढील टप्प्यातील वाढ ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) यांच्या बळावर आकार घेत आहे, असे नक्की म्हणता येते. हे उद्योग स्पर्धात्मकता वाढवणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि अर्थव्यवस्थेत अधिक व्यापक सहभाग नोंदवणे यांमधून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सुमारे १४ टक्के योगदान

भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सध्या सुमारे २९ ते ३० टक्के वाटा उचलत आहेत. खरे तर त्यांची भूमिका यापेक्षाही व्यापक आहे. भारताच्या वस्तूनिर्मिती क्षेत्रात सुमारे ३६ टक्के आणि देशाच्या निर्यातीत तब्बल ४५ ते ४६ टक्के इतका मोठा वाटा या ‘छोट्या’ उद्योगांचा आहे. म्हणूनच देशाची औद्योगिक ताकद वाढवणे आणि जागतिक व्यापाराशी देशाला जोडणे यामध्ये या उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. महाराष्ट्र हे राज्य भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के योगदान देत असून, उद्योगवाढीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण उपलब्ध करून देते. राज्यात अंदाजे ७१ लाख एमएसएमई कार्यरत असून, विविध प्रकारच्या उद्योगांचे विस्तृत आणि विविधतेने भरलेले जाळे येथे दिसते. हे उद्योग उत्पादन, सेवा, लॉजिस्टिक्स, पर्यटन, कृषी-आधारित व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत.

जागतिक मागणी आणि गुणवत्ता

आताच्या काळात स्पष्टपणे दिसते की एमएसएम उद्योगांची भूमिका बदलत आहे. पूर्वी हे उद्योग स्वतंत्रपणे काम करीत होते; पण आता ते मोठ्या उद्योगसाखळ्यांचा आणि जागतिक मूल्यसाखळ्यांचा महत्त्वाचा भाग बनत आहेत. हा बदल विविध औद्योगिक क्लस्टर्समध्येही दिसून येतो. उदाहरणार्थ, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रामधील बहुसंख्य एमएसएमई हे प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि कॉम्पोनन्ट्सचे उत्पादन या माध्यमांतून प्रगत ऑटोमोबाईल उद्योगाशी जोडले गेले आहेत. कोल्हापूर येथील फाउंड्री उद्योग आजही निर्यात बाजारासाठी उत्पादन करतो, तर इचलकरंजीमधील वस्त्रोद्योग हा अधिक विशेष आणि मूल्यवर्धित उत्पादनाकडे वळत आहे. एकूणच, हे क्लस्टर्स एक महत्त्वाचा बदल दाखवतात, तो हा की एमएसएमई आता जागतिक मागणी आणि गुणवत्तेचे निकष यांनुसार स्वतःला सतत जुळवून घेऊ लागले आहेत.

राज्यभर नव्या संधी

या बदलांमुळे महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राची मोठी आर्थिक क्षमता स्पष्टपणे दिसून येते. हे उद्योग जागतिक दर्जा आणि संघटित मूल्यसाखळीशी जुळवून घेत असल्याने, राज्यभर त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिक व्यापक सहभागाला चालना मिळत असून, सातत्यपूर्ण आणि मजबूत आर्थिक वाढीसाठी भक्कम पाया तयार होत आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या संधींना अधिक गती मिळत आहे. मल्टिमोडल कॉरिडॉर्स, मजबूत लॉजिस्टिक्स व्यवस्था आणि नवीन आर्थिक क्षेत्रांचा विस्तार यांमुळे या छोट्या उद्योगांना बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे आणि वेगवान झाले आहे. यामुळे पारंपरिक औद्योगिक शहरांबाहेर असलेले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगही आता मोठ्या पुरवठा साखळ्यांचा भाग बनत आहेत. परिणामी, राज्यभर अधिक संतुलित आणि सातत्यपूर्ण औद्योगिक वाढ साध्य होत आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे कामकाजात बदल

याचबरोबर, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या उद्योगांच्या कामकाजात मोठा बदल घडत आहे. मुंबई, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद अशा शहरांमध्ये पेमेंट करणे वा घेणे, ग्राहक मिळवणे, दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे या कामांसाठी एमएसएमई डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. यातून या उद्योगांना बाजारपेठेत सहज प्रवेश मिळतो, त्यांचे कामकाज अधिक कार्यक्षम होते आणि मागणीत होणाऱ्या बदलांना ते जलद प्रतिसाद देऊ शकतात. डिजिटल पद्धतीने चालणारे एमएसएमई (डिजिटल-फर्स्ट एमएसएमई) ही एक नवीन पिढी म्हणून पुढे येत असून, यामुळे हे उद्योग भौगोलिक मर्यादांना ओलांडून तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगाने वाढ करू शकतात.

वित्तीय संस्थांची भूमिका

या बदलत्या वातावरणात वित्तीय संस्थांची भूमिकाही झपाट्याने बदलत आहे. बँका आता केवळ पारंपरिक कर्ज देण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत; त्या उद्योगांच्या गरजेनुसार विशेष उपाय, पुरवठा साखळीसाठी खास वित्तपुरवठा आणि एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म अशा गोष्टी उपलब्ध करून देत आहेत. औपचारिक कर्जसुविधा उपलब्ध झाल्यामुळे आणि औपचारिक पद्धतीत समावेश झाल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र अधिक संघटित होत असून भविष्यासाठी सज्ज होत आहे. विशेषतः नव्याने कर्ज घेणाऱ्या, नवीन बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या किंवा उत्पादन क्षमता वाढवू पाहणाऱ्या छोट्या उद्योगांसाठी हा दृष्टिकोन अधिक उपयुक्त ठरत आहे.

१ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे…

महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरच्या (१ ट्रिलियन = १ लाख कोटी) अर्थव्यवस्थेकडे जात आहे, असे आपण म्हणतो, म्हणजे राज्याची एकूण आर्थिक क्षमता, उत्पादन, उद्योग, सेवा आणि व्यापार यांची एकत्रित किंमत त्या एवढ्या मोठ्या पातळीपर्यंत वाढवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाकडे वाटचाल होत असताना एमएसएमईंचा पुढचा मार्ग अधिक स्पष्ट होत आहे. जास्त मूल्य असलेल्या क्षेत्रांत सहभागी होणे, संघटित पुरवठा साखळ्यांमध्ये अधिक खोलवर सामील होणे आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर करणे यावर हा मार्ग आधारलेला असेल. विद्युत वाहने, अन्न प्रक्रिया, पर्यटन आणि डिजिटल सेवा यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विस्ताराच्या संधी निर्माण होत आहेत. विशेषतः जे उद्योग बदलत्या बाजारपेठेच्या गरजांनुसार स्वतःला जुळवून घेतात, त्यांच्यासाठी या संधी अधिक फायदेशीर ठरणार आहेत.

विशेष कौशल्यांवर भर

उद्योगांच्या दृष्टीने पाहिले तर हा टप्पा म्हणजे काम करण्याच्या पद्धतीत बदल होण्याचा काळ आहे. विशेष कौशल्ये आत्मसात करण्यावर, क्षमता वाढवण्यावर आणि स्थानिक बाजारपेठेपलीकडे विस्तारण्यावर आता भर दिला जात आहे. जे एमएसएम उद्योग औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडले जातील, डिजिटल साधनांचा वापर करतील आणि मोठ्या औद्योगिक साखळ्यांमध्ये स्वतःला बसवतील, ते यापुढे राज्याच्या अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, असे दिसते.

३५ कोटी लोकांना रोजगार

भारतातील एमएसएमई क्षेत्राची व्याप्ती आधीच प्रचंड मोठी आहे. या सुमारे ७.९४ कोटी उद्योगांमध्ये जवळपास ३५ कोटी लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पाहिले तर, १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाणारा मार्ग अधिकाधिक उद्योगांच्या वाढीवर आधारित असल्याचे स्पष्ट दिसते. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सक्षम वित्तीय व्यवस्था यांच्या आधारावर एमएसएमई क्षेत्र पुढील काळात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची दिशा ठरवणार आहे.

(लेखक ॲक्सिस बँकेत कमर्शियल बँकिंग ग्रुप प्रेसिडेंट आणि हेड म्हणून कार्यरत आहेत.)