Maharashtra urea shortage deepens due to the recent Iran war: गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे सध्या सर्वत्र महागाईसुद्धा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. इराणमधील या तणावाच्या परिस्थितीमुळे भारतात शेतीसाठी लागणाऱ्या खतांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार गतवर्षापेक्षा जास्त खते उपलब्ध असल्याचा दावा करीत आहे. पण, प्रत्यक्षात ग्रामीण भागात युरियाची मोठी टंचाई जाणवत आहे. मंगळवारी (९ जून) मंत्रिमंडळ बैठकीचे औचित्य साधून अनेक लोकप्रतिनिधींनी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन युरिया टंचाईचे गाऱ्हाणे मांडले. मराठवाड्यात टंचाईची स्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या युरिया टंचाईमागे इराण युद्धाची काय भूमिका आहे हे पाहूया.

युरिया टंचाई आणि इराण युद्ध

युरिया उत्पादनात आखाती देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजनयुक्त खत म्हणून युरियाचे स्थान कायम आहे. २०२३-२५ या काळात जागतिक युरिया निर्यातीत आखाती देशांचा वाटा ३६% होता. यामध्ये इराण आणि कतार हे सर्वात मोठे निर्यातदार देश होते, त्यानंतर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. २०२५ मध्ये भारत, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, तुर्की, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका हे प्रमुख आयातदार देश होते.

इराण स्वतः युरियाचा एक मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. ‘एफएओस्टॅट’ (FAOSTAT) च्या अहवालात केवळ अत्यल्प अधिकृत निर्यातीची नोंद असली, तरी ‘इंटरनॅशनल फर्टिलायझर असोसिएशन’च्या (IFA) अंदाजानुसार, प्रत्यक्षात इराण हा आखाती प्रदेशातील युरियाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजवाहतुकीवरील निर्बंध घातले आहेत. यामुळे खते आणि इंधनाच्या किमतीत आधीच मोठी वाढ झाली आहे. आता भारतातही विशेष म्हणजे महाराष्ट्रात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक कायम राहिली, तर वाढलेल्या किमतींमुळे खतांचा वापर आणि पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर धोके निर्माण होऊ शकतात.

कृषी उत्पादन आणि वस्तूंच्या किमतींवरील परिणाम

खतांच्या वाढलेल्या किमती आणि इंधनाचा खर्च यामुळे कृषी उत्पादनालाही धोका निर्माण झाला आहे. खतांच्या किमतींमधील सध्याची वाढ ही तुलनेने कमी असलेल्या कृषी वस्तूंच्या किमतींसोबतच होत आहे. यामुळे आदान-प्रदान किमतींचे प्रतिकूल गुणोत्तर निर्माण होते, ज्यामुळे सामान्यतः खतांचा वापर कमी होतो आणि परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.