Mahindra Thar Shantanu Deshpande Bombay Shaving Company viral video: महिंद्रा समूहाची प्रसिद्ध कार थार तिच्या मूळ प्रतिमेपासून पूर्णपणे भरकटली असून, ती सुसंस्कृत ग्राहकांसाठी नसल्याचे खळबळजनक वक्तव्य बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक शंतनू देशपांडे यांनी केले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये शंतनू देशपांडे यांनी थारच्या वाढत्या हुल्लडबाज संस्कृतीवर आणि महिंद्राच्या शोरूममधील वातावरणावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. थारच्या या प्रतिमेमुळे महिंद्रा समूहाला भविष्यात या गाडीचे कोणतेही प्रीमियम मॉडेल आणता येणार नाही आणि कंपनी हुल्लडबाज ग्राहकांच्या घोळक्यात अडकली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शंतनू देशपांडे आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले, “थारने महिंद्रा समूहासाठी मोठी अडचण निर्माण करून ठेवली आहे. प्रॉडक्ट आणि ब्रँड एकमेकांशी अजिबात मेळ खात नाहीत. थारचे ब्रँडिंग उच्चभ्रू आणि एखादी ‘कूल’ कार असे करण्यात आले होते. पण परिस्थिती प्रत्यक्षात पूर्णपणे वेगळी आहे.”

थारचे ग्राहक आणि महिंद्राच्या शोरूममधील कर्मचाऱ्यांबाबत बोलताना शंतनू देशपांडे यांनी नमूद केले की, “उंच सीट्स, दिसायला दणकट, रस्त्यावर दादागिरी करणारी वृत्ती, बदल करायला सोपी रचना, मोठा आवाज असणारा एक्झॉस्ट आणि अत्यंत कमी किंमत यामुळे थार अशाच लोकांना आकर्षित करते, ज्यांना रस्त्यावर दादागिरी करणे आवडते, ज्यांचे शिक्षण कमी आहे, ज्यांना स्वतःचा अधिकार गाजवायला आवडतो आणि ज्यांना केवळ मोठेपणा मिरवायची आवड असते. आता अशी लोक गाडी घेतात, तर मग अशीच लोक तुमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आणि शोरूममध्ये ग्राहक म्हणून येतात. तसेच, तुम्हाला कर्मचारी म्हणून त्याच विशिष्ट प्रकारच्या लोकांना कामावर घ्यावे लागते. त्यामुळे, जेव्हा जेव्हा मी महिंद्राच्या शोरूमला भेट देतो, तेव्हा मला तिथे केवळ गुंडच दिसतात, मग ते ग्राहक असोत किंवा कर्मचारी.”

थारच्या भविष्याबाबत बोलताना शंतनू देशपांडे म्हणाले, “खरे तर मला जेव्हा ही गाडी बाजारात आली, तेव्हा आवडायची, पण आता मी तिच्या सावलीलाही उभा राहणार नाही. आता महिंद्रासाठी खरी अडचण ही आहे की ते या गाडीला अधिक उच्च दर्जाचे करू शकत नाहीत. कारण सुशिक्षित आणि सुसंस्कृत ग्राहकांसाठी यात आता काहीही उरलेले नाही. त्यामुळेच कंपनी ‘थार प्लस’, ‘थार गोल्ड’ किंवा ‘थार प्लॅटिनम’सारखे अधिक उच्च श्रेणीतील मॉडेल आणू शकणार नाही. ते या गाडीचे मूल्य अजिबात वाढवू शकत नाहीत. परिणामी, आता तुम्ही केवळ हुल्लडबाज ग्राहकांच्या घोळक्यात अडकले आहात आणि अशा ब्रँडसोबत उरला आहात, ज्याने प्रत्यक्षात स्वतःच्या सर्व क्षमता स्वतःच संपवून टाकल्या आहेत.”

शंतनू देशपांडे यांच्या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज

शंतनू देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला ५ लाख ९१ हजार व्ह्यूज मिळाले असून, २२ हजार युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. याचबरोबर यावर १ हजार कमेंट्सही आल्या आहेत.