Maruti Suzuki Flex Fuel Car : इंधन दरवाढीच्या रोजच्या कटकटीला कंटाळलेल्या वाहन चालकांसाठी एक गुड न्यूज आहे. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ‘मारुती सुझुकी’ आपली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार बाजारपेठेत आणण्यासाठी सज्ज झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही कार बाजारात सादर केली जाणार आहे. यामुळे इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून देशाचे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हिरो मोटोकॉर्प आज ३ जून २०२६ रोजी राजधानीत देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्युएल मोटरसायकलचे अनावरण करणार आहे.
मारुती सुझुकी सादर करणार देशातील पहिली ‘इथेनॉल कार’
गुरुवार ४ जून २०२६ रोजी ‘मारुती सुझुकी’ दिल्लीतील एका कार्यक्रमात देशातील पहिली १००% इथेनॉल वर चालणारी कार सादर करणार आहे. मारुती सुझुकीने अद्याप गाडीचे नाव जाहीर केले नसले तरी शर्यतीत ‘वॅगनआर फ्लेक्स फ्युएल’ आणि ‘फ्रॉन्क्स फ्लेक्स फ्युएल’ ही दोन मॉडेल्स आघाडीवर आहेत. वॅगनआरचे प्रोटोटाइप २०२४ च्या एक्स्पोमध्ये आणि फ्रॉन्क्सचे फ्लेक्स व्हर्जन २०२५ च्या जपान मोबिलिटी शोमध्ये दाखवण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच वाहन चाचणी आणि प्रमाणीकरण नियमांमध्ये सुधारणा करून E100 वाहनांचा समावेश केला आहे, ज्यामुळे कंपन्यांना ही शुद्ध इथेनॉल वाहने बाजारात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान म्हणजे काय?
फ्लेक्स फ्युएल वाहने ही पेट्रोल आणि इथेनॉलच्या वेगवेगळ्या मिश्रणावर (उदा. E85 किंवा थेट E100) धावण्यासाठी विशेष पद्धतीने तयार केली जातात. ही वाहने साध्या पेट्रोल गाड्यांपेक्षा वेगळी असतात, कारण इथेनॉलच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार करून यामध्ये विशेष इंधन प्रणाली घटक, इंजिन कॅलिब्रेशन आणि इथेनॉल-प्रतिरोधक मटेरिअलचा वापर पाईप्स आणि सील्समध्ये केला जातो. सध्या भारतात E20 इंधनाचा नियम लागू आहे, ज्यामध्ये पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित केले जाते. मात्र, आता सरकार थेट १००% इथेनॉलकडे पावले टाकत आहे.

सरकारचा इथेनॉलवर इतका भर का?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आकडेवारीनुसार, भारताला आपल्या पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी तब्बल ८७ टक्के इंधन परदेशातून आयात करावे लागते. इथेनॉलच्या वापरामुळे देशाचे अब्जावधी डॉलर्सचे आयात बिल वाचणार असून परकीय चलनाची मोठी बचत होईल. इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून केली जाते. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढल्याचा फायदा शेतकरी आणि अर्थव्यवस्थेला होणार आहे. याशिवाय, गाड्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत मिळेल.
पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त मिळणार?
सध्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण केलं जात आहे. भविष्यात जेव्हा १०० टक्के इथेनॉलवर वाहने धावतील तेव्हा नक्कीच इंधनाचे दर परवडणारे असतील. भारतात १ लीटर इथेनॉलची किंमत साधारणपणे ५२ ते ६५ रुपये आहे. केंद्र सरकारने इंधन मिश्रणासाठी (E20 पेट्रोल) खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५७.९७ रुपयांपर्यंत निश्चित केले आहेत. त्यामुळे इंधनदर थेट निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. अद्याप तरी सरकारने यावर अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
