Maruti Suzuki Sales : भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ने पुन्हा एकदा धमाका केला आहे. एप्रिल महिन्यातील विक्रीची घट भरुन काढत मे २०२६ मध्ये विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. कंपनीने स्थानिक बाजारपेठ आणि निर्यात अशी एकूण २,४२,६८८ वाहनांची विक्री केली आहे. मारुती सुझुकीच्या इतिहासातील ही एका महिन्यातील सर्वोच्च विक्री ठरली आहे. एवढेच नाही तर कंपनीने देशांतर्गत बाजारातही १,९३,५३५ वाहनांची विक्री करून स्वतःचाच जुना विक्रम मोडला आहे. यात कोणत्या वाहनांची सर्वाधिक विक्री झाली? कुठे सेल्स घसरला? याचा आढावा घेऊ.

देशांतर्गत बाजारपेठेतील मजबूत पकड

तुम्ही देशातील कोणत्या रस्त्यावरुन जात आहात आणि एकही मारुती सुझुकी कंपनीची गाडी पाहायला मिळाली नाही, असं सहसा शक्य होणार नाही. यावरुन या कंपनीची देशात किती मजबूत पकड आहे, हे दिसते. आता आकडेवारीवरुन याची खात्रीही करुन घ्या. मे २०२६ मध्ये कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी गाड्या या विभागात १,९०,३३७ वाहनांची विक्री झाली. तर हलके व्यावसायिक वाहने विभागात ३,१९८ युनिट्सची विक्री झाली. इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना केलेल्या ७,२३९ वाहनांच्या पुरवठ्यासह मारुतीची एकूण देशांतर्गत विक्री २,००,७७४ युनिट्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी मे महिन्यात १,४८,८५८ युनिट्स होती.

कोणत्या वाहनांना सर्वाधिक पसंती?

मारुती सुझुकीच्या विक्रीत युटिलिटी व्हेईकल पोर्टफोलिओचा सिंहाचा वाटा आहे. या विभागामध्ये ब्रेझा, अर्टिगा, ई-विटारा, फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, इनव्हिक्टो, जिम्नी , व्हिक्टोरिस आणि एक्सएल६ (XL6) या गाड्यांचा समावेश होतो. मे महिन्यात या विभागात ७९,२६७ युनिट्सची विक्री झाली तर याच महिन्यात गेल्या वर्षी हा आकडा ५४,८९९ युनिट्स इतका होता.

पॅसेंजर कार विभागातही जोरदार पुनरागमन

अल्टो, एस-प्रेसो अशा छोट्या कार विभागातील वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून मे २०२६ मध्ये १६,२७५ गाड्या विकल्या गेल्या, जी गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये अवघी ६,७७६ युनिट्स होती. कॉम्पॅक्ट आणि मिड-साईज कारमध्ये बलेनो, सेलेरियो, सियाझ, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, वॅगनआर या सर्वाधिक लोकप्रिय सेगमेंटमध्ये कंपनीने ८१,५५५ वाहनांची विक्री नोंदवली आहे, जी गेल्या वर्षी ६१,९६० युनिट्स होती. या दोन्ही विभागांची मिळून एकूण कार विक्री ९७,८३० युनिट्सवर पोहोचली आहे (मे २०२५ मध्ये हा आकडा ६८,७३६ होता).

ईको व्हॅन आणि सुपर कॅरीची स्थिर कामगिरी

मारुतीची ही बहुउपयोगी व्हॅन नेहमीप्रमाणेच आपली मागणी टिकवून आहे. मे २०२६ मध्ये १३,२४० ईको गाड्यांची विक्री झाली. तर सुपर कॅरी या हलक्या व्यावसायिक वाहन श्रेणीतील ‘सुपर कॅरी’ची विक्री २,७२८ युनिट्सवरून वाढून ३,१९८ युनिट्सवर पोहोचली आहे.

जागतिक बाजारात ‘मेड इन इंडिया’चा डंका

मारुती सुझुकीच्या गाड्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. मे २०२६ मध्ये कंपनीची निर्यात वाढून ४१,९१४ युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी मे महिन्यात ३१,२१९ युनिट्स इतकी होती.