Maya Tata Westside Trent Group : टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत असल्याने भावी पिढीच्या नेतृत्वाबाबत सध्या कॉर्पोरेट जगतात मोठी चर्चा सुरू आहे. अशावेळी नोएल टाटा यांची कन्या माया टाटा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे ट्रेंट समूहाच्या ‘वेस्टसाइड’ या आघाडीच्या फॅशन रिटेल चेनच्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे. ३७ वर्षीय माया टाटा यांनी नुकताच ‘टाटा डिजिटल’मधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मोठी जबाबदारी

‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, या मोठ्या निर्णयामागे त्यांचे वडील आणि ट्रेंट समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा यांची प्रमुख भूमिका असल्याचे समजते. नोएल टाटा हे चालू वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात या पदावरून निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी आपल्या कन्येला समूहातील एका अत्यंत महत्त्वाच्या ब्रँडची जबाबदारी देऊन ते कारभार पुढील पिढीच्या हाती देत असल्याचे दिसत आहे.

‘वेस्टसाइड’चे ट्रेंट समूहातील महत्त्व

ट्रेंट समूहाच्या एकूण महसुलात एकट्या ‘वेस्टसाइड’चा वाटा तब्बल ४० टक्के आहे. वेस्टसाइडने नुकतेच युएईमध्ये आपले पहिले स्टोअर सुरू करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये वेस्टसाइडने ५२ नवीन स्टोअर्स सुरू केली असून, दरवर्षी अंदाजे ५० नवीन स्टोअर्स उघडण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

टाटा डिजिटलमधील अनुभवाचा फायदा

माया टाटा यांनी यापूर्वी टाटा डिजिटलमध्ये ग्राहक संपादन आणि ऑनलाइन रिटेल क्षेत्रात काम केले आहे. टाटा डिजिटलच्या ताफ्यात बिगबास्केट, टाटा न्यू, क्रोमा आणि टाटा १एमजी यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे, ज्यामध्ये टाटा सन्सने २४,००० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. टाटा डिजिटलमधील वाढत्या तोट्याबाबत नोएल टाटा यांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यानंतर या कंपनीत अंतर्गत पुनर्रचना सुरू झाली. याच काळात माया टाटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

टाटा भावंडांकडे समूहाची सूत्रे

नोएल टाटा यांच्या तिन्ही मुलांकडे आता समूहातील महत्त्वाच्या कंपन्यांचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. एकप्रकारे नोएल टाटा यांनी आपली जबाबदारी पुढील पिढीकडे दिली असल्याचे दिसत आहे. यामध्ये वेस्टसाइडचे ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग प्रमुख माया टाटा यांच्याकडे, तर भाऊ नेव्हिल टाटा स्टार बझार पाहत आहे आणि बहीण लिया टाटा ताज हॉटेल्स चेनची जबाबदारी सांभाळत आहे. नेव्हिल आणि लिया यांनी सुरुवातीपासून एकाच व्यवसायावर लक्ष केंद्रित केले असताना, माया टाटा यांनी मात्र टाटा कॅपिटल, टाटा डिजिटल आणि आता ट्रेंट अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून अष्टपैलू अनुभव घेतला आहे. याशिवाय, हे तिन्ही भावंडे टाटा सन्सची मुख्य भागधारक असलेल्या ‘टाटा ट्रस्ट्स’च्या अंतर्गत छोट्या संस्थांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत.

नोएल टाटा निवृत्त होणार?

टाटा समूहामध्ये संचालक मंडळावरील सदस्यांचे निवृत्तीचे वय ७० वर्षे आहे. यापूर्वीही समूहातील अनेक दिग्गजांनी ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. नोएल टाटा या वर्षी नोव्हेंबर २०२६ मध्ये ७० वर्षांचे होत असल्याने, ते समूहाच्या कंपन्यांमधील आपल्या कार्यकारी आणि बिगर कार्यकारी पदांचा राजीनामा देऊ शकतात. सध्या नोएल टाटा ट्रेंट लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि वोल्टास या कंपन्यांचे अध्यक्षपदी, तर उपाध्यक्ष म्हणून टाटा स्टील आणि टायटनची जबाबदारी सांभाळत आहे. नोव्हेंबरमध्ये वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर ते या सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळावरून पायउतार होतील.