OLA Cab Driver Business : तुम्हाला जर सांगितलं की वार्षिक २५ लाख रुपयांचे पॅकेज असलेला तरुण नोकरी सोडून ओला कॅब चालवतोय तर तुम्ही त्याला काय म्हणाल? सामान्यपणे कोणीही या निर्णयाचे समर्थन करणार नाही. त्याच्या नातेवाईकांनीही यावरुन त्याला टोमणे मारले. मात्र, त्या तरुणाची संपूर्ण कहाणी वाचली तर तुम्हाला त्याच्या निर्णयाचा नक्कीच अभिमान वाटेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शशी सचान (Shashi Sachan) नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या भावाची ही स्टोरी शेअर केली आहे. एका उच्चशिक्षित तरुणाने कॉर्पोरेट जगताला रामराम ठोकून बिझनेस क्षेत्रात कशी उत्तुंग भरारी घेतली, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

२५ लाखांचे पॅकेज नाकारून का झाला कॅब चालक?

शशी सचान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या भावाने नामांकीत कॉलेजमधून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण संपल्यानंतर त्याच्या हातात वार्षिक २५ लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर होती. मात्र, गलेलठ्ठ पगार मिळूनही त्याचं कॉर्पोरेट जगात कधीच मन रमलं नाही. अखेर एके दिवशी त्याने ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने थेट ‘ओला’ची टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला.

‘शिक्षण वाया घालवले…’

लोकांना नोकऱ्या मिळत नाही, आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू असताना तरुणाने असा निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नातेवाईकांनी त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतले. शिक्षण वाया गेले ते काय होतास तू आणि काय झालास तू.. इतकं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली.

टीकेकडे दुर्लक्ष करत व्यवसायावर लक्ष

लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत त्या तरुणाने आपल्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला स्वतः एकच कार चालवण्यापासून सुरुवात करून, त्याने हळूहळू आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आणि एकामागून एक गाड्या खरेदी केल्या. आज ३ वर्षांनंतर त्याच्याकडे ओला अंतर्गत स्वतःच्या ५ कार धावत आहेत. या ट्रान्सपोर्ट बिझनेसमधून तो आता दरमहा सुमारे १.५ लाख रुपये कमावतो. या प्रवासाचा धडा सांगताना शशी यांनी लिहिले, “काही वेळा जो मार्ग सुरुवातीला ‘डाऊनग्रेड’ वाटतो… तोच पुढे आयुष्याचा खरा ‘अपग्रेड’ ठरतो.”

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

या पोस्टवर इंटरनेट युझर्सकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असून, नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायाला आणि समाधानाला महत्त्व देण्याच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. एकजण म्हणाला, की “जेव्हा मला समजले की मी ट्रेडिंग करून ५ मिनिटांत ५० हजार रुपये कमावू शकतो, तर मी ८ तास का कंपनीत घासत बसू?” दुसऱ्या एकाने लिहिलंय की नोकरी इतकी काही वाईट नाही. नोकरीत राहिला असता, तर ३ वर्षांत त्याचे सॅलरी पॅकेज ३० ते ३५ लाख रुपये वार्षिक झाले असते. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडिया पाहायला मिळत आहेत.