McVities Whole Wheat Marie Fine: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ‘मॅकविटीज होल व्हीट मेरी’ बिस्किटांची विक्री करणाऱ्या प्लाडिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपल्या उत्पादनावर “होल व्हीट” असा दावा करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. कारण यामुळे बिस्किटांमधील घटकांबाबत ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. याचबरोबर प्राधिकरणाने कंपनीवर १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा आदेश २८ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आला आहे. पूर्वी प्लाडिस इंडिया, युनायटेड बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने ओळखली जात होती.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशानुसार, “आरोग्यदायी”, “नैसर्गिक” आणि “सेंद्रिय” म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या एका सोशल मीडिया व्हिडिओचा संदर्भ एका वृत्तपत्रातील लेखात दिल्यानंतर हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले. त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या उत्पादनांमध्ये मॅकव्हिटीज होल व्हीट मेरी बिस्किटांचा समावेश होता.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असे आढळून आले की, पॅकेटवर “होल व्हीट” हे शब्द ठळकपणे लिहिलेले होते, तर घटकांच्या यादीतून असे दिसून आले की, त्या बिस्किटांमध्ये केवळ १९.५ टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ आणि ५२ टक्के मैदा होते.
प्राधिकरणाने म्हटले की, यामुळे ग्राहकांचा असा समज होऊ शकतो की ते प्रामुख्याने संपूर्ण गव्हापासून बनवलेले बिस्किट खरेदी करत आहेत, परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती.
कंपनीने असा युक्तिवाद केला की, ‘होलव्हीट’ हा त्यांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा एक भाग होता आणि त्याचा अर्थ बिस्किटे पूर्णपणे संपूर्ण गव्हापासून बनवली आहेत असा होत नाही. तसेच कंपनीने पाकिटावरील एका स्पष्टीकरणाकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये म्हटले होते, “हा केवळ एक ट्रेडमार्क आहे आणि उत्पादनाचे वास्तविक स्वरूप दर्शवत नाही.”
ट्रेडमार्क म्हणजे दिशाभूल करणारा दावा करण्याचा परवाना नव्हे
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी स्पष्ट केले की, ‘होलव्हीट’ हा शब्द एका नोंदणीकृत ट्रेडमार्कचा भाग असला, तरी त्यामुळे कंपनीला ग्राहकांची दिशाभूल करणारा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही. तसेच पाकिटाच्या दर्शनी भागावर ठळकपणे केलेल्या दाव्याची त्रुटी केवळ त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणाद्वारे सुधारता येत नाही, असेही त्यांना आढळून आले.
“नोंदणीकृत ट्रेडमार्कला मिळणारे संरक्षण म्हणजे ट्रेडमार्कच्या नावाखाली दिशाभूल करणारे विधान करण्याचा परवाना नव्हे. विशेषतः अशा परिस्थितीत जिथे उत्पादनात केवळ १९.५ टक्केच गव्हाचे पीठ आहे,” असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे.
