Mehli Mistry Tata Trusts Case : देशातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा टाटा उद्योग समूह सध्या अंतर्गत संघर्षावरुन चर्चेत आहे. टाटा ट्रस्ट्सचे माजी ट्रस्टी मेहली मिस्त्री यांनी ट्रस्टच्या विद्यमान नेतृत्वाला आणि प्रशासकीय व्यवस्थेला थेट महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांसमोर आव्हान दिले आहे. गेल्याच महिन्यात मिस्त्री यांना ‘सर रतन टाटा ट्रस्ट’मधून हटवले होते. त्यांनी फक्त यावरच प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर ट्रस्टींच्या नियुक्त्या, बोर्डाचे निर्णय, त्यांना मिळणारे मानधन आणि एकूणच टाटा समूहातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एकीकडे अंतर्गत संघर्ष आणि दुसरीकडे टाटा समूहातील महत्त्वाच्या कंपन्यांना होणारा तोटा यामुळे गुंतवणूकदारही संभ्रमावस्थेत गेले आहेत.

टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना मिळणारे ‘मानधन’ वादाचे मूळ?

मेहली मिस्त्री यांनी चॅरिटी कमिशनरकडे दाखल केलेल्या अर्जात प्रामुख्याने टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्यासह इतर दोन दिग्गज ट्रस्टींच्या मानधनावर आणि कमिशनवर कायदेशीर आक्षेप घेतले आहेत. मिस्त्री यांच्या दाव्यानुसार, चॅरिटेबल संस्थांचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्तींना व्यावसायिक कंपन्यांकडून अशा प्रकारे वैयक्तिक मानधन मिळणे हे त्यांच्या नैतिक आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांशी सुसंगत आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

मिस्त्री यांच्या याचिकेत तिघांवर आक्षेप

  • नोएल टाटा (अध्यक्ष, टाटा ट्रस्ट्स) : टाटा सन्सकडून त्यांना मिळणारे १.४२ कोटींचे वार्षिक कमिशन तपासणीच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • विजय सिंग (माजी संरक्षण सचिव व ट्रस्टी) : २०१३ ते २०२५ या काळात त्यांनी टाटा समूहाच्या कंपन्यांकडून तब्बल २०.१ कोटीं रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप याचिकेत आहे.
  • वेणू श्रीनिवासन (उद्योगपती व ट्रस्टी) : टाटा सन्स, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स, टाटा लॉकहीड मार्टिन आणि टाटा सिकोर्स्की एरोस्पेस या कंपन्यांकडून त्यांना गेल्या काही वर्षांत एकत्रितपणे २० कोटींपेक्षा जास्त कमिशन मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

टाटा ट्रस्ट आणि ‘टीव्हीएस’ कनेक्शन

कमिशन व्यतिरिक्त, वेणू श्रीनिवासन यांच्या व्यावसायिक भूमिकेवरही मिस्त्री यांनी बोट ठेवले आहे. श्रीनिवासन हे टीव्हीएस समूहाचे चेअरमन एमेरिटस आहेत. जग्वार लँड रोव्हरचे तत्कालीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गेरी मॅकगव्हर्न यांची टीव्हीएसच्या मालकीच्या ‘नॉर्टन मोटरसायकल्स’मध्ये सल्लागार म्हणून झालेली नियुक्ती संशयास्पद असल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला आहे. जग्वार लँड रोव्हर ही टाटा समूहाची कंपनी असल्याने, या संपूर्ण व्यवस्थेत हितसंबंध जोपासले गेले का आणि टीव्हीएसने या सेवांसाठी जेएलआरला कोणतीही रक्कम अदा केली होती का, याचा खुलासा मिस्त्री यांनी मागितला आहे.

रतन टाटांच्या निधनानंतर धोरणांमध्ये बदल?

  • दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टने घेतलेल्या काही अंतर्गत ठरावांचे उल्लंघन काही ट्रस्टींनी केल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला आहे. पूर्वी एकमताने मंजूर झालेल्या धोरणांच्या विरोधात काही ट्रस्टींनी नंतर जाहीर भूमिका घेतल्याचे अर्जात म्हटले आहे.
  • टाटा सन्सला ‘अनलिस्टेड’ कंपनी म्हणून ठेवतानाच, अल्पसंख्याक शेअरहोल्डर असलेल्या शापूरजी पालनजी समूहाला बाहेर पडण्यासाठी आयपीओ व्यतिरिक्त दुसरा मार्ग देण्यावर आधी सहमती झाली होती. मात्र, नंतर काही ट्रस्टींनी या ठरलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी आणि विसंगत भूमिका जाहीरपणे मांडल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला आहे.
  • जोपर्यंत टाटा ट्रस्ट्समधील हे प्रशासकीय आणि आर्थिक वादाचे मुद्दे पूर्णपणे सुटत नाहीत, तोपर्यंत ट्रस्टच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी एका ‘स्वतंत्र प्रशासकाची’ नियुक्ती चॅरिटी कमिशनरनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मेहली मिस्त्री किंवा टाटा ट्रस्ट्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.

१२ जूनच्या बैठकीकडे लक्ष

टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची येत्या १२ जून २०२६ महत्त्वाची बैठक होणार आहे. यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. समूहातील काही महत्त्वाच्या कंपन्यांना झालेला तोटा, टाटा ट्रस्टचे संभाव्य लिस्टिंग हेही चर्चेचे मुद्दे असणार आहेत.