Mehli Mistry Tata Trusts Case Noel Tata Irish Citizenship: मेहली मिस्त्री यांनी टाटाच्या दोन ट्रस्ट्समधील आपला कार्यकाळ संपुष्टात आणणाऱ्या निर्णयांना आव्हान दिले आहे. एका अपात्र विश्वस्ताने त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केले आणि आपल्यासाठी विश्वस्त नियुक्तीचे वेगळे नियम लागू केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

याचबरोबर मेहली मिस्त्री यांनी बाई हिराबाई ट्रस्टच्या करारानुसार नोएल टाटा यांच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि विश्वस्तांशी संबंधित कमिशन, आर्थिक लाभ आणि संभाव्य हितसंबंधांच्या संघर्षाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या तीन प्रत्युत्तरांमध्ये, मिस्त्री यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन यांनी सादर केलेल्या युक्तिवादांना आव्हान दिले आहे. तिसरे प्रत्युत्तर, तीन टाटा ट्रस्ट्सच्या प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या त्यांच्या स्वतंत्र अर्जावरील आक्षेपांना उत्तर देणारे आहे.

मिस्त्री यांनी बाई हिराबाई संस्थेशी संबंधित ‘चेंज रिपोर्ट ६७८/२०२६’च्या विरोधात एक स्वतंत्र आव्हान दाखल केले आहे. त्यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘सर्क्युलर रिझोल्यूशन ६७१’ वर, तसेच त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबतच्या निर्णयामध्ये नोएल टाटा, श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नोएल टाटा यांच्या पात्रतेबाबतचा त्यांचा आक्षेप ७ डिसेंबर १९२३ च्या ‘ट्रस्ट डीड’मधील कलम ६ आणि १८ वर आधारित आहे. मिस्त्री यांच्या मते, या तरतुदींनुसार विश्वस्तांनी झोरास्ट्रियन (पारशी) धर्माचे पालन करणे आणि ते पूर्वीच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ किंवा नवसारीमधील विशिष्ट भागांचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.

आयरिश नागरिकत्व, गोल्डन व्हिसा अन् धार्मिक अटी

मेहली मिस्त्री यांनी नोएल टाटा यांच्याकडे त्यांच्या पात्रतेबाबत शपथपत्र मागितले आहे. यात त्यांनी टाटा यांची आयरिश नागरिकत्व, संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) निवासस्थान, गोल्डन व्हिसा दर्जा, तसेच धार्मिक आणि निवासी अटींचे पालन यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे आक्षेप केवळ आरोप असून, धर्मादाय आयुक्त यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय दिलेला नाही.

दुसरीकडे ट्रस्टचा असा युक्तिवाद आहे की, पात्रतेशी संबंधित या तरतुदी अवैध असून त्या मूळ मृत्युपत्र आणि मृत्युपत्रातील सुधारणांच्या अधिकारांच्या पलीकडच्या आहेत. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश एम. एच. कानिया यांचे मार्च २००० मधील कायदेशीर मत सादर केले आहे.