Mehli Mistry Resigns RNT Associates : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष बनलेल्या नोएल टाटा यांच्या कार्यकाळात समूहात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यामध्ये आता आणखी एका बदलाचा समावेश झाला आहे. टाटा समूहातील अत्यंत विश्वासू आणि दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे निकटवर्तीय मेहली के. मिस्त्री यांनी ‘आरएनटी असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रतन टाटा यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीचे व्यवस्थापन ही कंपनी पाहत होती.

‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, मेहली मिस्त्री यांनी ३० जून रोजी संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात, ‘इतर कामांच्या व्यस्ततेमुळे’ १ जुलै २०२६ पासून आपण या पदावरून पायउतार होत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, “दिवंगत रतन नवल टाटा यांनी ज्या उद्देशाने या कंपनीची स्थापना केली, ते उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी संचालक मंडळ आणि कंपनीला माझ्या शुभेच्छा,” असे मिस्त्री यांनी पत्रात म्हटले आहे.

स्टार्टअप उद्योगाचा मोठा आधार

देशातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात रतन टाटा नेहमी अग्रेसर राहिले आहेत. आरएनटी असोसिएट्स या कंपनीच्या माध्यमातून भारतातील अनेक आघाडीच्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. यात ओला इलेक्ट्रिक, लेन्सकार्ट, फर्स्टक्राय, अर्बन कंपनी, ब्लूस्टोन, कारदेखो अशा अनेक स्टार्टअपला रतन टाटा यांनी बळ दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरएनटी असोसिएट्स’ ही मूळ कंपनी सिंगापूरमधील ‘आरएनटी असोसिएट्स सिंगापूर’ची होल्डिंग कंपनी म्हणून काम करते, जी परदेशातील पोर्टफोलिओ सांभाळते. भारतातील या कंपनीची एकूण गुंतवणूक साधारण १,००० कोटी रुपये आहे. तर सिंगापूरमधील युनिटकडे सुमारे ३ कोटी डॉलर्सची (अंदाजे २५० कोटी रुपये) गुंतवणूक आहे.

कोण आहेत मेहली मिस्त्री?

मेहली मिस्त्री हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून टाटा समूहातील सर्वात प्रभावी पण पडद्यामागे राहून काम करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. रतन टाटा यांचे ते अत्यंत जवळचे सल्लागार होते. टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छापत्राचे जे मोजके अंमलबजावणी करणारे नेमण्यात आले, त्यात मिस्त्री यांचा समावेश आहे.

टाटा ट्रस्टकडे सूत्रे जाण्याची शक्यता

यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून मेहली मिस्त्री बाजूला झाले होते. आता त्यांनी आरएनटी असोसिएट्सचाही राजीनामा दिल्याने, रतन टाटा यांच्या १,००० कोटींच्या या गुंतवणूक पोर्टफोलिओ आता टाटा ट्रस्टकडे जाण्याची शक्यता आहे. टाटा यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचे चॅरिटेबल कामांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचाच हा एक भाग असल्याचे समजते.

सध्या रतन टाटा यांच्या संपूर्ण व्यवस्थापनात जमशेद पोचा (रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टचे प्रमुख), आर. आर. शास्त्री (रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशनचे प्रमुख) आणि सिद्धार्थ शर्मा (टाटा सन्सचे जनरल काउन्सिल) हे कायदेशीर व इतर बाबी पाहत आहेत. मिस्त्री यांच्या या एक्झिटमुळे कॉर्पोरेट आणि स्टार्टअप जगतात आता टाटा समूहाच्या पुढील पाऊलांकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.