Mehli Mistry Tata Medical Center resignation : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ग्रुपमधून त्यांचे एक-एक विश्वासू सहकारी बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. नुकतेच रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी आणखी एका महत्त्वाच्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्याचे प्रसिद्ध टाटा मेडिकल सेंटर चालवणाऱ्या ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा महली मिस्त्री यांनी राजीनामा दिला आहे.

३० सप्टेंबरला संपणार कार्यकाळ

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, मेहली मिस्त्री यांनी आपला सध्याचा कार्यकाल ३० सप्टेंबर रोजी संपत असताना, पुन्हा विश्वस्त होण्यासाठी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. टाटा मेडिकल सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पत्ताथियिल यांना १५ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या ईमेलमध्ये त्यांनी हा निर्णय कळवला आहे.

आपल्या पत्रात त्यांनी लिहिलंय की, “मी ३० सप्टेंबर २०२६ रोजी टाटा मेडिकल सेंटरचा विश्वस्त म्हणून माझा कार्यकाळ संपत असल्याचे कळवू इच्छितो. मी पुन्हा नियुक्त होण्यास इच्छूक नाही आणि माझा हा निर्णय रेकॉर्डवर ठेवावा.” हा ईमेल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि इतर विश्वस्त – विजय सिंग, दारियस खंबाटा, लीह टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा यांनाही पाठवण्यात आला आहे.

टाटा समूहातील ही सहावी एक्झिट!

  • दिवंगत रतन टाटा यांच्या निधनानंतर (ऑक्टोबर २०२४) मेहली मिस्त्री यांची टाटा समूहाशी जोडलेल्या संस्थांमधून बाहेर पडण्याची ही सहावी वेळ आहे. यापूर्वी जुलै २०२६ मध्ये रतन टाटा यांनी वैयक्तिक गुंतवणुकीसाठी स्थापन केलेल्या ‘आरएनटी असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालक पदाचा त्यांनी राजीनामा दिला.
  • याआधी त्यांनी ‘रतन टाटा एन्डोमेंट ट्रस्ट’ आणि ‘रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशन’च्या विश्वस्त पदाचाही राजीनामा दिला होता. मेहली मिस्त्री २०१७ पासून टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डावर कार्यरत होते. त्यांच्या जाण्यामुळे आता बोर्डात अध्यक्ष नोएल टाटा, त्यांची मुले (लीह, माया आणि नेव्हिल टाटा) आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंग हे सदस्य उरले आहेत.

टाटा मेडिकल सेंटरचे महत्त्व

कोलकाता येथील टाटा मेडिकल सेंटर हे ४३६ खाटांचे नामांकित कर्करोग रुग्णालय असून, तेथे परवडणाऱ्या दरात कर्करोगावर उपचार केले जातात. मेहली मिस्त्रींच्या या एक्झिटमुळे टाटा समूहाच्या अंतर्गत संस्थांमध्ये मोठे बदल होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

टाटा सन्स आणि नोएल टाटा वाद

एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा ५ वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाला टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी विरोध केला असून प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे.