Mehli Mistry Tata Trusts Ouster legal challenge: टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) मधून त्यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. विश्वस्त वेनू श्रीनिवासन यांंनी विश्वस्त म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आपल्या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केले, असा युक्तिवाद मिस्त्री यांनी केला आहे.

गुरुवारी, बृहन्मुंबई विभागाच्या उप धर्मादाय आयुक्तांसमोर सादर केलेल्या प्रत्युत्तरात, मिस्त्री यांनी त्यांच्या हकालपट्टीची नोंद करण्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टने दाखल केलेल्या बदल अहवालाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, ट्रस्टच्याच उत्तरात हे मान्य करण्यात आले आहे की, श्रीनिवासन यांनी मतदान केले तेव्हा ते विश्वस्त नव्हते.

प्रत्युत्तरानुसार, श्रीनिवासन यांचा कार्यकाळ २३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीबाबतचे परिपत्रक त्यांना त्याच दिवशी दुपारी ३:५१ वाजता, म्हणजेच त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी पाठवण्यात आले होते. श्रीनिवासन यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. त्यांची विश्वस्त म्हणून पुनर्नियुक्ती १२ नोव्हेंबर २०२५ पासूनच करण्यात आली होती.

सर दोराबजी टाटा ट्रस्टने म्हटले आहे की, मिस्त्री यांच्याबाबत निर्णय घेताना श्रीनिवासन यांचे मत मोजले गेले नाही. परिपत्रकातील एका तळटीपेमध्ये नमूद केले आहे की, ही नोंद विचारात घेऊ नये, कारण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. मिस्त्री यांचा असा युक्तिवाद आहे की, नंतरच्या टप्प्यावर मत रद्द केल्याने ही समस्या सुटत नाही. त्यांच्या मते, हा निर्णय अशा एका समितीद्वारे घेण्यात आला होता, ज्यामध्ये विश्वस्त नसलेली व्यक्तीही समाविष्ट होती. यामुळे संपूर्ण ठरावच अवैध ठरतो.

मिस्त्री यांनी ट्रस्टच्याच कायदेशीर युक्तिवादाचा वापर त्यांच्याविरुद्धच केला आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टने ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम’ (Maharashtra Public Trusts Act) च्या कलम ३०ए(१) चा आधार घेत असे म्हटले आहे की, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यकाळ संपल्यानंतर मिस्त्री विश्वस्त म्हणून आपोआप पदमुक्त झाले. मिस्त्री यांच्या मते, याच तरतुदीमुळे श्रीनिवासन सुद्धा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विश्वस्त पदावरून मुक्त होतात.

या प्रत्युत्तरात, मिस्त्री यांनी अशी मागणी केली आहे की, २४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्रीनिवासन यांनी ज्या ज्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला होता, त्या सर्वांचा तपशील जाहीर करण्यात यावा.

मिस्त्री यांनी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी विश्वस्तांनी घेतलेल्या एका ठरावाचाही आधार घेतला आहे. ज्यानुसार विश्वस्तांची पुन्हा नियुक्ती करताना त्यांच्या कार्यकाळावर कोणतीही मर्यादा नसेल, असे ठरले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा ठराव नोएल टाटा आणि श्रीनिवासन यांच्या बाबतीत लागू करण्यात आला, परंतु त्यांच्याबाबतीत तो लागू केला गेला नाही. मिस्त्री यांचा असा दावा आहे की, टाटा समूहाच्या कंपन्यांकडून काही विश्वस्तांना मिळालेल्या कमिशनबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आले.

मिस्त्री यांनी दाखल केलेल्या एका स्वतंत्र अर्जात, त्यांनी या कमिशनच्या प्रकरणांची आणि संबंधित पक्षांशी संबंधित बाबींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.