Layoff Meta Employee Frar: फेसबुकची पालक कंपनी मेटाच्या एका महिला कर्मचाऱ्याने असा दावा केला आहे की, नोकरी गमावण्याची आणि नोकरीच्या सुरक्षिततेची सततची भीती इतकी आहे की, यामुळे तिने मूल जन्माला घालण्याची आपली योजना पुढे ढकलली आहे. यामुळे कामाच्या ठिकाणच्या अनिश्चिततेचा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणाऱ्या परिणामाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
कामाच्या ठिकाणची संस्कृती, पगार आणि नोकरीशी संबंधित मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांच्या चर्चेचे व्यासपीठ असलेल्या ब्लाइंड या ॲपवर एका महिलेने आपला अनुभव निनावीपणे शेअर केला आहे. तिने सांगितले की, आपल्या पतीशी भविष्याबाबत चर्चा केल्यानंतरच तिने हा निर्णय घेतला.
“मेटामध्ये नोकरी करत असताना मुले जन्माला घालण्याचा विचार मी सोडून दिला आहे . हे सर्व लिहिताना मला विचित्र वाटतेय, पण पतीशी चर्चा केल्यानंतर मला अखेर जाणीव झाली आहे. मेटामध्ये नोकरी सुरू असताना मला मूल जन्माला घालण्याचा विचार सोडून द्यावा लागेल”, असे या महिलेने नमूद केले.
संबंधित कर्मचाऱ्याच्या मते, प्रसूती रजेवरून परत येईपर्यंत आपली नोकरी टिकून राहील की नाही, याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे तिने हा निर्णय घेतला.
“पुढच्या वर्षीही मी इथे नोकरीवर असेनच याची काहीच खात्री नाही, मग प्रसूती रजेवरून परत येईपर्यंतची तर गोष्टच सोडा”, असे तिने पुढे लिहिले.
तिने म्हटले की, कंपनीची कार्यपद्धती, पूर्णपणे अस्थिर मोबदला (TC) आणि नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव यामुळे कुटुंब नियोजनाचा विचार करणे कठीण झाले आहे. स्थिर उत्पन्न किंवा नोकरीची खात्री नसल्यामुळे, मूल जन्माला घालण्याचा विचार करणेच तिला योग्य नसल्याचे वाटू लागले आहे.
“दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझे ‘बायोलॉजिकल क्लॉक’ (प्रजननक्षमतेचे वय) वेगाने पुढे सरकत आहे. या मूर्खपणाच्या नोकरीमुळे जर मला कधीच मुले होऊ शकली नाहीत तर?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
फास्ट-फूडच्या दुकानात काम करावे लागेल
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, “हे बऱ्याच काळापासून घडत आहे. म्हणूनच जन्मदर कमी आहे.” तर दुसऱ्या एका युजरने असा युक्तिवाद केला की, चांगला पगार असलेली तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी गमावण्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात.
“नोकरीची सुरक्षितता किती क्षणभंगुर असू शकते, यावर फारशी चर्चा होत नाही. जर तुम्हाला वयाच्या ३० व्या वर्षी मेटामधून काढून टाकले गेले, तर तुमचे वार्षिक उत्पन्न कदाचित २ लाख डॉलर्सनी (सुमारे १.६ कोटी रुपये) कमी होऊ शकते किंवा तुम्हाला थेट फास्ट-फूडच्या दुकानात काम करण्याची वेळ येऊ शकते. या चिंतेचा मध्यमवर्गीय महिलांवर वाईट परिणाम होतो”, असे तो युजर म्हणाला.
