Meta India Lays Off Employees : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरातील दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. नोकरकपातीच्या या लाटेचा फटका आता फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा इंडिया’च्या कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेटाने भारतातील आपल्या जाहिरात विक्री, विपणन आणि इंडिविज्युअल काँट्रीब्यूटर या विभागांतील जवळपास डझनभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

चर्चा न करता मध्यरात्री पाठवले ‘कोल्ड ईमेल’

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना काढण्यात आले, अगदी त्याच धर्तीवर भारतातील कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थापनाकडून थेट ‘कोल्ड ईमेल’ पाठवण्यात आले. नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांशी साधी चर्चाही केली नाही. या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ४ ते ६ महिन्यांचे वेतन देण्याची ऑफर देण्यात आली आहे. या प्रकरणावर ‘इकोनॉमिक टाईम्स’ने शुक्रवारी पाठवलेल्या सविस्तर ईमेलला मेटा इंडियाच्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

जगभरात ८,००० कर्मचाऱ्यांची नोकरी जोणार

उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, मेटाच्या भारतीय कार्यालयात सुमारे ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. मेटाने नुकतीच आपल्या इतिहासातील सर्वात मोठी पुनर्रचना जाहीर केली आहे, ज्यामध्ये जागतिक स्तरावर सुमारे ८,००० नोकऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. या कपातीची सुरुवात कर्मचाऱ्यांना पहाटे ४ वाजता ईमेल पाठवून करण्यात आली होती. याशिवाय, कंपनीने आपल्या ७,००० कर्मचाऱ्यांना ‘एआय’शी संबंधित नवीन उपक्रमांमध्ये शिफ्ट केलं आहे. यामागे व्यवस्थापकीय पदे कमी करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, या नोकरकपातीमुळे आणि बदल्यांमुळे कंपनीच्या एकूण कार्यबळापैकी जवळपास २०% कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम झाला आहे.

अधिक वेगवान आणि लहान टीम तयार करण्याची मेटाची योजना

मेटाला ‘एआय युगात’ वेगाने काम करण्यासाठी कमी व्यवस्थापकीय स्तर असलेली आणि गतिमान संस्था उभी करायची आहे. कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर जेनेल गेल यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, “या पुनर्रचनेची आखणी लहान टीम तयार करण्यासाठी केली गेली आहे.

‘एआय’वरील खर्चात ८७% ची अफाट वाढ!

मेटाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील आपल्या गुंतवणुकीत प्रचंड वाढ केली आहे. मार्च तिमाहीच्या कमाईच्या बैठकीत, मेटाने आर्थिक वर्ष २०२६ साठीचा आपला भांडवली खर्चाचा अंदाज १२५ ते १४५ अब्ज डॉलर्स दरम्यान वाढवला आहे. कंपनीच्या एआयवरील या खर्चात वार्षिक आधारावर तब्बल ८७ टक्क्यांची अफाट वाढ झाली आहे. या नोकरकपातीचे अंतर्गत समर्थन करताना मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “यश ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. ‘एआय’ हे आपल्या जीवनकाळातील सर्वात महत्त्वाचे आणि परिणामकारक तंत्रज्ञान आहे. जे उद्योग यामध्ये आघाडी घेतील, तेच पुढच्या पिढीची व्याख्या ठरवतील.”