Meta Layoffs 2026 : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी असलेली टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘मेटा’ पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपाती करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या जागतिक मनुष्यबळापैकी तब्बल १० टक्के म्हणजेच सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कंपनीच्या अंतर्गत वर्तुळात या दिवसाला ‘प्रलयदीन’ असे म्हटलं जात आहे. यामुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावात असून ऑफिसमध्ये मोफत मिळणारे स्नॅक्स, ड्रिंक्स आणि चार्जर्स आपल्या बॅगेत भरून घरी नेत आहे. अनेकांसाठी ही नोकरी जगण्याचा एकमेव आधार आहे.

लाखोंचे पॅकेज घेणाऱ्यांवर, फ्री स्नॅक्सवर जगण्याची वेळ

मेटा कंपनीत २० मे २०२६ रोजी या वर्षातील कर्मचारी कपातीची पहिली मोठी लाट आणणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. मेटाच्या एका माजी कर्मचारी अदेल वू हिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे तेथील परिस्थिती मांडली आहे. नोकरी गमावण्याच्या भीतीने कार्यालयात वातावरण अत्यंत गंभीर झाले आहे. पुढील दिवस कसे काढायचे? या धास्तीने अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ घरी घेऊन जात आहे, इतकी वाईट वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.

२०२३ नंतरची सर्वात मोठी कर्मचारी कपात

२०२३ च्या सुरुवातीला मेटाने ‘इयर ऑफ एफिशियन्सी’ मोहिमेअंतर्गत सुमारे २१,००० नोकऱ्या कमी केल्या होत्या. त्यानंतरची ही समूहातील सर्वात मोठी कपात मानली जात आहे. सध्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असली, तरी व्यवस्थापनातील स्तर कमी करणे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने कामाची कार्यक्षमता वाढवणे, हा या कपातीमागील मुख्य उद्देश असल्याचे समजते. “आम्ही आमची टीम सुटसुटीत करत आहोत, जेणेकरून गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ राहणार नाही,” असे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गृ यांनी स्पष्ट केले आहे.

‘मेटा’चे नाव असूनही नोकरी मिळेना

कर्मचारी कपातीच्या भीतीने अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर आता इतर कंपन्यांमध्ये नोकरी शोधत आहेत. अनुभव असूनही एन्ट्री लेव्हलची नोकरी मिळवण्यात कर्मचाऱ्यांना जड जात आहे. एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केले, की त्याने जवळपास २५० ठिकाणी एन्ट्री लेव्हल नोकऱ्यांसाठी अर्ज केले. माझ्या रेझ्युमेवर ‘मेटा’ सारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे नाव असतानाही मला प्रतिसाद मिळाला नाही. तो कर्मचारी सध्या मेटाच्या ‘PyTorch’ टूलिंगवर C++ आणि पायथन भाषेमध्ये काम करतो. मात्र, कंपनीने संपूर्णपणे ‘AI नेटिव्ह’ होण्यावर भर दिला आहे. सध्याचे बहुतांश कोडिंगचे काम ‘क्लॉड’कडून करून घेतले जात असल्याने, मानवी कर्मचाऱ्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे त्याने सांगितले.

‘मेटा’ची नुकसान भरपाईची योजना

कर्मचाऱ्यांना हा आघात सहन करण्यासाठी मेटाने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठे ‘सेव्हरन्स पॅकेज’ जाहीर केले आहे, ज्याला कॉर्पोरेट भाषेत ‘गोल्डन पॅराशूट’ म्हटले जात आहे. यात तब्बल १६ आठवड्यांचा (४ महिने) मूळ पगार दिला जाईल. कंपनीतील प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी अतिरिक्त २ आठवड्यांचा पगार बोनस मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुढील १८ महिन्यांसाठी (दीड वर्ष) कंपनीकडून सशुल्क आरोग्य कव्हरेज दिले जाणार आहे. एका अंदाजानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीकडून सुमारे ३ कोटींहून अधिक रुपये इतका आर्थिक लाभ दिला जात आहे.

भारतात काय स्थिती?

एक काळ असा होता की ग्लॅमरस आयुष्य जगणारे तरुण-तरुणी दिसले की, हा ‘आयटी’मध्ये असणार असा प्रत्येकाचा ठाम विश्वास असायचा. आयटी क्षेत्राने पुणे, हैदराबाद, बंगळुरू सारख्या शहरांचा कायापालट केला. परिणामी इथे नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची चढाओढ सुरू झाली. मात्र, गेल्या वर्षभरापासून या क्षेत्राला ‘आर्टिफिशियल इंटिलिजेन्स’ची नजर लागली. तेव्हापासून गुगल, मायक्रोसॉफ्ट, टीसीएस सारख्या दिग्गज कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत किमान १ लाख तरुणांनी आपला रोजगार गमावला आहे. यामुळे सध्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.