Microsoft Layoffs Marathi News : तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने यावर्षी दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनी जागतिक स्तरावरील ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. या कर्मचारी कपातीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसल्याचं कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, एआयमुळे पहिल्या ५ महिन्यात दीड लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे.

शेअर्समध्ये २३ टक्क्यांची घसरण

वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये तब्बल २३ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१२ नंतरची कंपनीची ही पहिल्या सहामाहीतील सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे. एकीकडे शेअर्स घसरत असताना, दुसरीकडे एआय तंत्रज्ञानावरील खर्च प्रचंड वाढला आहे.

कर्मचारी कपातीचं कारण काय?

या वर्षात संपूर्ण टेक जगतात एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर ७०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. एकट्या मायक्रोसॉफ्टने २०२६ मध्ये डेटा सेंटर्स आणि एआय उत्पादनांसाठी तब्बल १९० अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या प्रचंड खर्चामुळे कंपनीच्या रोख प्रवाहावर मोठा ताण आला असून खर्च कमी करण्यासाठी कपातीचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

सर्वाधिक फटका मायक्रोसॉफ्टच्या ‘एक्सबॉक्स’ला

मायक्रोसॉफ्टने २०१३ मध्ये ६९ अब्ज डॉलर्सला ‘अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड’ आणि ७.५ अब्ज डॉलर्सला ‘झेनीमॅक्स मीडिया’ या कंपन्या खरेदी करून गेमिंग क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. मात्र, या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतरही कंपनीला अपेक्षेप्रमाणे आर्थिक परतावा मिळालेला नाही.

गेमिंग विभागाच्या प्रमुख आशा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “चालू जनरेशनच्या सुरुवातीच्या तुलनेत आमची प्लॅटफॉर्म टीम ४० टक्क्यांनी मोठी झाली होती. मात्र, त्या प्रमाणात गेमर्स आणि त्यांचा गेमिंगचा वेळ घटला आहे. व्यावसायिक गणिते चुकल्यामुळे आम्हाला एक्सबॉक्सच्या पुनर्रचनेचा निर्णय घ्यावा लागला.”

सत्या नाडेला काय म्हणाले?

आकडेवारीनुसार, एक्सबॉक्सला आपल्या गेमिंग स्टुडिओमध्ये गुंतवलेल्या प्रत्येक १ डॉलरमागे सरासरी ६४ सेंट्सचे नुकसान सहन करावे लागत होते. याशिवाय मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींमुळे एक्सबॉक्स कन्सोलच्या किमती वाढल्या, ज्यामुळे बाजारातील मागणी आणखी मंदावली. “आम्हाला गेमिंग क्षेत्राला एका शाश्वत आणि फायदेशीर व्यवसायात बदलायचे आहे, जो मनोरंजनाचा एक उत्तम स्त्रोत बनेल. आज परिस्थिती अशी आहे की, यूट्यूबवर गेमिंगचे स्ट्रीमिंग करणारे अनेक गेमर्स मायक्रोसॉफ्टपेक्षा जास्त कमाई करत आहेत. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे”, असं मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नाडेला म्हणाले.