Mobile recharge price hike updates: भारतातील मोबाइल युजर्सच्या दृष्टीने एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्राबाबतच्या एका अहवालानुसार आगामी तीन ते चार महिन्यांत भारतातील दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफमध्ये (मोबाइल रिचार्जचे दर) आणखी १२ ते १५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
“बाजारात केवळ ‘३+१’ कंपन्या उरल्यामुळे दर निश्चितीसाठीची परिस्थिती अधिक अनुकूल झाली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की पुढील ३ ते ४ महिन्यांत दरांमध्ये आणखी १२ ते १५ टक्क्यांची वाढ होईल”, असे या ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने आपल्या अहवालात दूरसंचार क्षेत्राच्या आर्थिक कामगिरीबाबतच्या असे नमूद केले आहे की, जून तिमाहीत तीन खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या ‘प्रति युजर सरासरी महसुलात’ (ARPU) तिमाही-दर-तिमाही आधारावर १ ते १.५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचे २जी वरून ४जी आणि ५जी नेटवर्कवर होणारे स्थलांतर, पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत झालेली वाढ आणि या तिमाहीतील दिवसांची अधिक संख्या हे या वाढीमागील प्रमुख घटक आहेत.
सेंट्रमने म्हटले आहे की, व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओचा ग्राहक बाजारातील हिस्सा वाढत राहण्याची शक्यता आहे.
“व्हीआयएलच्या तुलनेत भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ आपला ग्राहक बाजारातील हिस्सा वाढवत राहतील. रिलायन्स जिओला तिमाही-दर-तिमाही आधारावर सुमारे ७० लाख ग्राहक मिळण्याची, तर भारती एअरटेल तिमाही-दर-तिमाही आधारावर सुमारे ५० लाख नवे ग्राहक मिळेल अशी अपेक्षा आहे. व्हीआयएल तिमाही-दर-तिमाही आधारावर सुमारे २० लाख नेव ग्राहक मिळतील अशी आमची अपेक्षा आहे”, असे अहवालात म्हटले आहे.
डेटा वापर वाढणार
देशभरात ४जी आणि ५जी चा प्रसार वाढत असल्याने, प्रति ग्राहक डेटा वापर उच्च राहील अशी अपेक्षाही ब्रोकरेजने व्यक्त केली आहे.
“४जी आणि ५जी नेटवर्कचा विस्तार वाढत असल्याने प्रति ग्राहक डेटा वापराचे प्रमाण उच्च राहील. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने ९० टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये ५जी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आता त्यांच्या नेटवर्कवर अधिकाधिक ५जी उपकरणांचा समावेश करण्यावर त्यांचा भर आहे”, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, “५जी एफडब्ल्यूए आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवांच्या जोडणीमध्येही या दोन्ही कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण या क्षेत्रात अद्याप सेवांचा प्रसार कमी आहे.”
