Siddaramaiah Criticism By Mohandas Pai: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींना वेग आला आहे. २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयानंतर, सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाले होते. तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, आज दुपारी ३ वाजता सिद्धरामय्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जागी आता डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती मोहनदास पै यांनी कर्नाटकची अर्थव्यवस्था आणि सिद्धरामय्या यांच्या काकिर्दीवर भाष्य केले आहे.
‘एक्स’ एका युजरने माजी मुख्यमंत्री बसवेश्वर बोम्मई यांनी त्यांच्या कार्यकाळात कसे चांगले आर्थिक निर्णय घेतले होते याबाबत टिप्पणी केली आहे. तो युजर म्हणाला, “माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी २०२१ मध्ये इंधनाचे दर प्रति लिटर ७ रुपयांनी कमी केले होते. तरीही त्यांनी सलग दोन वर्षे राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत कुशलतेने हाताळली आणि अतिरिक्त महसुलाचे अर्थसंकल्प सादर केले. तसेच, त्यांनी ‘पीएम-किसान’ (PM-KISAN) योजनेअंतर्गत अतिरिक्त ४,००० रुपये आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली. याव्यतिरिक्त, फॉक्सकॉन प्रकल्प, विक्रमी गुंतवणूक, नळाद्वारे पाणीपुरवठा जोडण्या, ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी योजना आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांनी साध्य केल्या.”
या युजरच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना उद्योगपती मोहनदास पै यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, “हो, दुर्दैवाने बोम्मई मुख्यमंत्री पदावरून गेले तेव्हा त्यांनी कर्नाटची अर्थव्यवस्था २०,००० कोटी रुपये फायद्यात होती. मात्र सिद्धरामय्या यांनी आपल्या महागड्या आणि ‘खैरात योजनां’ना (Doles) निधी पुरवण्यासाठी कर्ज घेऊन, त्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर २०,००० कोटी रुपयांच्या वार्षिक महसूल तुटीमध्ये (Revenue Deficit) केले. कर्ज घेऊन खैरात योजनांना निधी पुरवणे, हीच त्यांची खासियत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे.”
मोहनदास पै यांचे व्यवसाय
जून २०११ मध्ये आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसमधून बाहेर पडणारे मोहनदास पै हे, देशातील स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक सक्रिय गुंतवणूकदार आहेत. त्यांनी ‘मनिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजन पै यांच्यासोबत मिळून, १०० दशलक्ष डॉलर्सच्या ‘आरिन कॅपिटल’ या व्हेंचर कॅपिटल फंडाची सह-स्थापना केली आहे. तसेच, ते ‘एक्स्फिनिटी व्हेंचर्स’ या B2B व्हेंचर फंडाचाही एक भाग आहेत. हा फंड त्यांनी त्यांचे इन्फोसिसमधील माजी सहकारी व्ही. बालकृष्णन, विप्रोचे माजी सीईओ गिरीश परांजपे आणि आय-फ्लेक्स सोल्युशन्सचे माजी सीईओ दीपक घैसास यांच्यासोबत सुरू केला आहे.
