नवी दिल्ली : चलनविषयक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आणि महागाई दर स्थिर राखण्यास यशस्वी ठरल्याने भविष्यातील जागतिक धक्के पेलण्यासाठी उदयोन्मुख देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक चांगल्या स्थितीत आहे, असे मूडीज रेटिंग्सने मंगळवारी प्रतिपादन केले. भविष्यातील कोणत्याही तणावाच्या काळात मजबूत आणि मुबलक उपलब्ध असलेल्या परकीय चलन गंगाजळीचा योग्य वापर करण्यास देश समर्थ असल्याची पुस्तीही या संस्थेने जोडली.

जागतिक पातळीवर वर्ष २०२० पासून भारतीय अर्थव्यवस्था उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून गणली जात आहे. मोठ्या परकीय गंगाजळीमुळे बाह्य जागतिक धक्क्यांच्या काळात चलनातील अस्थिरता रोखण्यास आणि अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली आहे, असे या जागतिक पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.

तथापि भारतावरील तुलनेने अधिक कर्जाचा बोजा आणि कमकुवत वित्तीय संतुलन हे एकामागून एक येणाऱ्या धक्क्यांना प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीला मर्यादित करत आहे, असेही मूडीजने पुढे म्हटले आहे. अलीकडील बाह्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिरता कायम राखण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आधीच घेतले गेले होते, असेही तिने मूडीजने नमूद केले.

अनेक उदयोन्मुख देशांनी गेल्या पाच वर्षांत जोखीम प्रीमियममध्ये मोठी वाढ न होऊ देता जागतिक धक्के पचवले आहेत. धोरणात्मक चौकटींमधील सुधारणा आणि राखीव निधीची उभारणी, तसेच विशेषतः अनुकूल बाह्य परिस्थिती दर्शवते.

चार तणावपूर्ण प्रसंगांमध्ये उत्तम कामगिरी

जागतिक स्तरावर ओळखल्या गेलेल्या चार तणावपूर्ण प्रसंगांमध्ये, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी (भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, मलेशिया, थायलंड, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, तुर्कस्तान, अर्जेंटिना) उत्तम कामगिरी बजावली आहे. या चार घटनांमध्ये, २०२० च्या सुरुवातीला करोना महासाथीचा प्रादुर्भाव, २०२२ मधील जागतिक चलनवाढीचा भडका आणि त्यासंबंधित अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे कठोर धोरण, २०२३ च्या सुरुवातीला अमेरिकेतील प्रादेशिक बँकिंग क्षेत्रावरील ताण आणि २०२५ मध्ये पुन्हा निर्माण झालेला व्यापार शुल्कवाढीचा ताण यांचा समावेश आहे.

मूडीजच्या मते, या चार घटना बाह्य धक्क्यांची एक अशी श्रेणी दर्शवतात, ज्यातून चलन विनिमय दरावरील दबाव, निधीपुरवठ्याच्या कडक अटी आणि पुनर्वित्त पुरवठ्याच्या जोखमींच्या माध्यमातून उदयोन्मुख देशांवर ताण निर्माण होतो. मात्र उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी २०२० पासून एकामागून एक आलेल्या बाह्य धक्क्यांच्या परिणामांना पचवण्यात यश मिळवले आहे.