मुंबई : स्थिर आर्थिक नेतृत्वामुळे भारताला सातत्यपूर्ण दोन अंकी वाढ साधता येणे शक्य आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले.

जिओब्लॅकरॉकच्या मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना अंबानी म्हणाले की, पुढील दशकभरात आपली इंधनाची गरज ही ८० टक्के आयात करून भारत भागवणार नाही, इतके ऊर्जा स्वावलंबन देशाकडे असेल.

आगामी १५-२० वर्षे सातत्यपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा हे आर्थिक वाढीसाठी आवश्यक आहेत, असे अंबानी म्हणाले. देशात १०० नवीन रिलायन्स कंपन्या उदयास येताना स्पष्टपणे दिसत आहेत, असेही अंबानी म्हणाले.

पुढील २०-२५ वर्षे भारताचे युग असेल आणि पुढील दशकभरात भारताचा ८ ते १० टक्के विकासवेग असेल, असे ब्लॅकरॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी फिंक यांनी सांगितले. एका नवीन युगासाठी गुंतवणूक या विषयावर फिंक यांच्याशी अब्जाधीश मुकेश अंबानी संवादाचा कार्यक्रम योजण्यात आला होता. त्यासमयी बोलताना, अमेरिकी बहुराष्ट्रीय गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.

आता भारताचे युग आहे आणि ते पुढील २०-२५ वर्षे टिकेल, असे ते म्हणाले. ‘हे ‘भारताचे युग’ आहे म्हणजे काय, हे लोकांना समजावून सांगण्यावर आमचा भर आहे. भारताच्या वाढीबद्दल विचार करतानाही आमचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे. भारताच्या या युगावर विश्वास ठेवणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाची आयात आणि कोणत्याही देशाचा मूलभूत पाया म्हणजेच निवृत्तीसाठी बचतीच्या आधारावर देशांतर्गत अर्थव्यवस्था उभारणे या दोन्हींचा मिलाफ आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

देशाच्या वाढीसोबतच स्वतःची वाढ होण्यासाठी अधिक लोकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाबद्दल विचार करण्यास, देशातील मोठ्या कंपन्यांसोबत वाढण्यास, त्याचा एक भाग बनण्यास आणि सहभागी होण्यास लोकांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे.