Dhurandhar Franchise : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यातून केवळ रणवीर सिंहचे स्टारडम वाढले नाही तर चित्रपट निर्माती कंपनी जिओ स्टुडिओजही मालामाल झाली आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात भागधारकांना लिहिलेल्या पत्रात जिओ स्टुडिओजच्या अभूतपूर्व यशाचा विशेष गौरव केला आहे. जिओ स्टुडिओज निर्मित ‘धुरंधर’ने जगभरात तब्बल ३,००० कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. भारतच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये धुरंधरचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
३५० कोटींचे बजेट आणि ३,००० कोटींची कमाई
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांचे मिळून एकूण बजेट सुमारे ३५० कोटी रुपये होते. या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने जागतिक स्तरावर केलेली ३,००० कोटींची कमाई ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी कामगिरी मानली जात आहे.
जिओ स्टुडिओजचे एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट
मुकेश अंबानी यांच्या पत्रानुसार, जिओ स्टुडिओजने भारतीय चित्रपटसृष्टीत सलग तीन वर्षे देशातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट देण्याचा बहुमान मिळवला आहे. यामध्ये २०२४ साली प्रदर्शित झालेला आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला स्त्री २, २०२५ मध्ये धुरंधर आणि २०२६ मधील धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटांचा समावेश आहे.
रिलीज स्ट्रॅटेजीचा जागतिक प्रयोग
“आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओ स्टुडिओजने ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हे विक्रम मोडणारे स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट रिलीज केले. या फ्रँचायझीने बॉक्स ऑफिस, रिलीज स्ट्रॅटेजी, मॉनिटायझेशन मॉडेल्स आणि जागतिक ग्राहकांप्रती नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत,” असे अंबानी यांनी पत्रात नमूद केले.
या फ्रँचायझीचा पहिला भाग गेल्या वर्षी डिसेंबर (२०२५) मध्ये रिलीज झाला होता, तर त्याचा सिक्वेल अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच या वर्षी मार्च (२०२६) मध्ये थिएटरमध्ये आला. “भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात एकाच वेळी दोन भागांचे नियोजन करणे, फायनान्स करणे, शूटिंग करणे आणि इतक्या कमी कालावधीत दोन्ही भाग रिलीज करणे असा प्रयोग यापूर्वी कधीही झाला नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आठ वर्षांत जिओ स्टुडिओजची गरुड झेप
गेल्या आठ वर्षांच्या प्रवासात जिओ स्टुडिओजने केवळ चांगला कंटेन्ट दिला नाही तर प्रेक्षकांशी नाळ जोडली आहे. स्थापनेपासून सातत्याने नफ्यात राहिलेल्या जिओ स्टुडिओजने स्वतःला देशातील ‘नंबर १’ कंटेन्ट स्टुडिओ म्हणून सिद्ध केलं असल्याचे मुकेश अंबानी यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले.
