Mumbai Airport Flight Slot Shift : मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक आहे. मात्र, सध्या विमानकंपन्या आणि विमानतळाचे संचालन करणाऱ्या ‘अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड’ आमनेसामने आले आहेत. याला कारण ठरलंय टर्मिनल एकचा पुनर्विकास. विमानतळावरील ३३ टक्के आंतरराष्ट्रीय स्लॉट तात्पुरत्या स्वरूपात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याच्या निर्णयामुळे हा वाद पेटला आहे.
अदाणी एअरपोर्टची विमान कंपन्यांना डेडलाईन
अदाणी एअरपोर्ट्सने विमान कंपन्यांना ६ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत मुंबई विमानतळावरून कोणत्या उड्डाणांचे स्लॉट रद्द करून ते नवी मुंबईला हलवायचे आहेत, याची माहिती कंपन्यांना द्यावी लागणार आहे. आगामी जानेवारी २०२७ पासून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चे पुनर्विकास काम सुरू होणार असल्याने हा बदल केला जात आहे.
‘इंडिगो’ला सर्वाधिक फटका
सध्या टर्मिनल २ वरुन होत असलेल्या ७७० साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे २६५ स्लॉट्स (३३ टक्क) २५ ऑक्टोबरपासून तात्पुरते बंद केले जाणार आहेत. यामध्ये इंडिगोचे सर्वाधिक ७४ स्लॉट कमी होणार आहेत. याशिवाय एअर इंडियाचे ३३, अकासा एअरचे ११ आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे ७ स्लॉटवर परिणाम होईल. याशिवाय एतिहाद एअरवेज आणि एमिरेट्ससह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची प्रत्येकी १० उड्डाणे कमी केली जाणार आहेत.
विमान कंपन्यांचा विरोध का?
- हिवाळी उड्डाणांचे वेळापत्रक (ऑक्टोबर ते मार्च) आधीच ठरले आहे. त्यानुसार प्रवाशांची तिकिटेही बुक झाली आहेत. ऐन वेळी स्लॉट्स बदलल्यामुळे मोठे नुकसान होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. अदानी एअरपोर्टने हा निर्णय एकतर्फी घेतला असल्याचा आरोप एअरलाइन्स करत आहेत.
- आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (IATA) केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून या सक्तीच्या स्थलांतराला विरोध केला आहे. नवी मुंबई विमानतळावर ग्राऊंड हँडलिंग, केटरिंग, विमान देखभाल मंजुऱ्या, मालवाहतूक आणि क्रूच्या राहण्याची व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
- आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कंपनी ‘चॅलेंज ग्रुप’ने मुंबईतील आपली कार्गो सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. तर या निर्णयाला विरोध करताना, एअर फ्रान्स-केएलएमने म्हटले आहे की, आपले लांब पल्ल्याचे कामकाज दोन विमानतळांवर विभागल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम होईल.
यूडीएफ शुल्क कुणाला जास्त भरावे लागणार?
नवी मुंबई विमानतळावर प्रवासी विकास शुल्क हे मुंबई विमानतळाच्या तुलनेतसाडेतीन पट अधिक आहे. हे शुल्क विमान कंपन्या तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांकडून गोळा करून एअरपोर्ट ऑपरेटरला देतात. देशांतर्गत प्रवाशांसाठी ६२० रुपये, येणाऱ्या प्रवाशांसाठी २७० रुपये. आंतरराष्ट्रीय प्रवासावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी १,२२५ रुपये, येणाऱ्या प्रवाशांसाठी ५२५ रुपये आहे. शिवाय एप्रिल २०२७ पासून यात ६ टक्के पर्यंत वाढ होऊ शकते.
अदानी समूहाचा तोडगा
प्रवाशांवर पडणारा हा वाढता आर्थिक भार आणि शुल्कातील तफावत भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कॅश वाऊचर्स देण्याची योजना अदानी एअरपोर्ट्सने आखली आहे, तसेच नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लँडिंग फीमध्ये १०० टक्के सूट जाहीर केली आहे.
विमानतळ ऑपरेटरची बाजू काय?
मुंबई विमानतळावरून वर्षाला सुमारे ५.५ कोटी प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी केवळ ५० लाख प्रवाशांशी संबंधित (सुमारे ९ टक्के) उड्डाणे तात्पुरती स्थलांतरित केली जात आहेत. टर्मिनलच्या पुनर्विकासाचे काम जानेवारी २०२७ पासून सुरू होईल, ज्यामुळे या टर्मिनलची क्षमता ३३ टक्क्यांनी वाढून दरवर्षी १.५ कोटींवरून २ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल. नवी मुंबई विमानतळ सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
