मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला असून, सभासदांना सलग बाराव्या वर्षी १० टक्के लाभांश देण्याची कामगिरी केली आहे. बँकेचे निव्वळ मूल्य ५,७४७ कोटी रुपयांवर पोहोचले असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात ३५१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बँकेची ११५वी वार्षिक सर्वसाधारण सभा १० सप्टेंबर रोजी मुंबईतील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात झाली. सभेत बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. मागील वर्षी ६५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालेला असताना यंदा तो ७०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेचा स्वनिधी ८,१७५ कोटी रुपये झाला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार किमान ९ टक्के आवश्यक असताना बँकेने भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) १८.५० टक्के राखले आहे.

बँकेचा कर्ज-ठेव गुणोत्तर (सीडी रेशो) ७९ टक्के आहे.कर्जवाटप ३६,२४० कोटी३१ मार्च २०२६ अखेर राज्य बँकेची कर्जे ३६,२४० कोटी रुपयांवर पोहोचली असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात ६५२ कोटी रुपयांची वाढ झाली. बँकेकडे २०,००९ कोटी रुपयांच्या ठेवी असून, एकूण व्यवसाय ५६,२४९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायातही लक्षणीय वाढ झाली आहे. हा व्यवसाय २३ कोटी रुपयांवरून ६८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.सलग १४ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्गराज्य बँकेला गेल्या १४ वर्षांपासून सलग ‘अ’ ऑडिट वर्ग मिळत आहे.

तसेच गेल्या ११ वर्षांपासून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येत आहे. यंदाही १० टक्के लाभांशाच्या प्रस्तावाला सभेने बहुमताने मंजुरी दिली. बँकेने प्रथमच ‘आयएसओ २७००१-२०२२’ हे आंतरराष्ट्रीय माहिती-सुरक्षा मानांकन प्राप्त केले आहे. ११५ वर्षांचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सायबर सुरक्षेवर भर देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.