Mumbai Rain Updates Marathi : देशाची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ तिच्या गतिमानतेसाठी ओळखली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आर्थिक राजधानीची गती काहीशी मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनपासून विमान सेवेपर्यंत सर्वकाही प्रभावित झालं आहे. दरम्यान, या प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईकरांनी दाखवलेल्या चिकाटीचे उद्योग जगातून कौतुक होत आहे. जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मुंबईच्या जिद्दीला सलाम केला आहे.

मुंबई स्पिरिटचे कौतुक

“जगातील इतर कोणत्याही शहरात एवढा पाऊस पडला असता, तर तिथे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असते. मात्र, एवढ्या पावसातही मुंबईत कार्यालये सुरू आहेत, शेअर बाजार सुरळीत चालत आहे, विमानतळ कार्यरत असून लोक मिटींगला हजेरी लावत आहेत. हे या महान शहराच्या अद्भूत मानसिकतेचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत पार्थ जिंदाल यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.

विमान उड्डाणे आणि रेल्वे सेवेला मोठा फटका

पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजेपर्यंत तब्बल १७ विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर आगमन आणि प्रस्थान मिळून २१७ विमानांना उशीर झाला. दुसरीकडे, मुंबई-पुणे घाट मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील रस्ते वाहतूकही इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. तर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवरही दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

मुंबई आणि उपनगरात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आणि जनतेला प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

गरज असेल तरच घराबाहेर पडावे : मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी हवामान खात्याचा अंदाज वर्तवताना सांगितले की, दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे झाडे उन्मळून पडू शकतात. पावसाची तीव्रता सांगताना ते म्हणाले की, संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात, मात्र रविवारी एकाच दिवसात ३५० झाडे पडली आहेत. तरुणांनी सध्याच्या परिस्थितीत धबधबे किंवा धोकादायक पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.