Mumbai Rains 10 Minute Delivery operations update amid heavy downpour and flood alerts in Maharashtra: मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याचबरोबर मुंबईत मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ कायम असतानाच, फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स (१० मिनिटांत डिलिव्हरी) कंपन्यांनी पावसाळ्यासाठीच्या आपल्या उपाययोजना लागू केल्या आहेत. या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाचा त्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. असे असले तरी मुंबईत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसात ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’सारख्या सेवा टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी मनीकंट्रोल या वेबसाईटला सांगितले की, मुसळधार पाऊस असूनही ऑर्डर्सची संख्या आणि डिलिव्हरीचे प्रमाण पहिल्याइतकेच आहे. मात्र, त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला की, हवामानातील या बदलाचा हा सुरुवातीचाच टप्पा आहे आणि परिस्थिती बिघडल्यास कामकाजाबाबतची पावले अधिक कठोर केली जाऊ शकतात.

एका आघाडीच्या क्विक कॉमर्स कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला अद्याप कोणताही मोठा परिणाम दिसून आलेला नाही. ही सुरुवातीचीच वेळ आहे, पण आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”

पावसाळ्यातील नियोजित कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून, विविध प्लॅटफॉर्म्सनी सेवा अखंडपणे सुरू ठेवतानाच डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये रायडर्सना रेनकोट आणि इतर संरक्षक साधने देणे, ‘डार्क स्टोअर्स’वर प्रथमोपचार पेटींची उपलब्धता निश्चित करणे आणि डिलिव्हरी पार्टनर्सना पावसात जास्त वेळ राहणे टाळण्यास तसेच गरज भासल्यास मदत घेण्यास प्रोत्साहित करणाऱ्या जनजागृती मोहिमा राबवणे यांचा समावेश आहे.

केवळ रायडर्सच्या सुरक्षिततेपुरतीच ही तयारी मर्यादित नाही. क्विक कॉमर्स क्षेत्रातील एका कंपनीतील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलांनुसार प्लॅटफॉर्म्सना रिअल-टाइम प्रतिसाद देण्यात तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावते.

“पावसाचा जोर वाढल्यास डिलिव्हरीची कार्यक्षेत्रे मर्यादित होऊ शकतात. पूर किंवा पाणी साचल्यामुळे काही भागांत तात्पुरती सेवा देणे अशक्य होऊ शकते. मात्र, आमची अंदाज वर्तवणारी यंत्रणा आम्हाला या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. याद्वारे आम्ही डिलिव्हरी रायडर्सना अधिक मागणी असलेल्या भागांकडे वळवतो आणि त्यानुसार कामकाजात बदल करतो”, असे त्या व्यक्तीने सांगितले.

किराणा मालाची मगणी वाढण्याची शक्यता

मुसळधार पावसाच्या काळात ग्राहक घराबाहेर पडणे टाळत असल्याने किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढू शकते, असे मत उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र, मागणीतील कल किंवा सध्याच्या पावसामुळे कामकाजावर होणाऱ्या परिणामांबाबत कोणताही निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.