Muthukrishnan Dandapani Emergency Fund Warning: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे गुंतवणूक सल्लागार आणि चेन्नईस्थित म्युच्युअल फंड वितरक मुथुकृष्णन दंडपाणी यांनी लोकांना सांभाव्य आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आणि भक्कम इमर्जन्सी फंड उभारण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये मुथुकृष्णन दंडपाणी यांनी सांगितले की, लोकांनी असा इमर्जन्सी फंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो त्यांच्या कुटुंबाचा तीन वर्षांपर्यंतचा खर्च भागवू शकेल. याचबरोबर त्यांनी लोकांना नवीन कर्ज घेणे टाळण्याचा आणि घर खरेदी करणे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे यांसारख्या मोठ्या दीर्घकालीन आर्थिक निर्णयांचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.
पुन्हा एकदा सांगतो की…
मुथुकृष्णन दंडपाणी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हणाले, “मी काही नॉस्ट्रॅडॅमस नाही. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या काही शक्यतांविषयी मी गेल्या दोन वर्षांपासून सावध करत आलो आहे. मी हे पुन्हा एकदा सांगतो की, तुमच्या कुटुंबाचा तीन वर्षांचा संपूर्ण खर्च भागवू शकेल, असा सुरक्षित इमर्जन्सी फंड उभारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा.”
“नवीन कर्ज काढू नका. तसेच, रिअल इस्टेट किंवा घर खरेदी करण्यासारखी दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी अंगावर घेऊ नका”, असेही त्यांनी सांगितले.
पदापेक्षा सुरक्षित नोकरी महत्त्वाची
मुथुकृष्णन दंडपाणी यांनी या संभाव्य आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना विशिष्ट पद किंवा हुद्द्यापेक्षा उत्पन्नाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहनही केले. अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली जात असताना आणि आर्थिक अनिश्चिततेचा रोजगारावर परिणाम होत असताना, उत्पन्नाचे स्थिर साधन असणे हीच प्राथमिकता असायला हवी, असे त्यांनी सुचवले.
“नोकऱ्या आणि पदांबाबत खूप आग्रह धरू नका. सध्या उत्पन्न कसे सुरू राहिल याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे”, असे ते म्हणाले.
आता आभाळच कोसळणार आहे, असे नाही
पोस्टच्या शेवटी दंडपाणी यांनी म्हटले, “आता आभाळच कोसळणार आहे, असे नाही. जगाने यापूर्वीही अशी संकटे अनुभवली आहेत आणि भविष्यातही ती येतीलच. मात्र, नमूद केलेल्या गोष्टी केल्यास तुम्हाला कठीण काळात आर्थिक व भावनिकदृष्ट्या सावरण्यास मदत होईल आणि भविष्यात चांगले दिवस नक्कीच परत येतील.”
मुथुकृष्णन दंडपाणी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने, ते चिंतेत आहेत.
