N Chandrasekaran Salary Tata Sons : देशातील प्रतिष्ठित औद्योगिक समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा ग्रुपमधून मोठी बातमी समोर येत आहे. समूहातील काही कंपन्यांची मंदावलेली नफाक्षमता पाहता टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी चालू आर्थिक वर्षात कोणतीही पगारवाढ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. समूहातील काही नवीन व्यवसायांची नफाक्षमता आणि भांडवल वाटपाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे ‘द इकॉनॉमिक टाईम्स’च्या अहवालात म्हटले आहे.

एन. चंद्रशेखरन यांना किती पगार मिळतो?

एन. चंद्रशेखरन हे भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या व्यावसायिकांपैकी एक आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण मानधन १५ टक्क्यांनी वाढून १५५.८ कोटी रुपये झाले होते. त्यांच्या एकूण पॅकेजमध्ये १५.१ कोटी रुपये निश्चित पगार आणि भत्त्यांचा समावेश आहे. तर उर्वरित तब्बल १४०.७ कोटी रुपये हे कंपनीच्या नफ्याशी जोडलेले कमिशन आहे.

पगारवाढ नाकारण्यामागील मुख्य कारणे

  • टाटा समूहाची महसुली वाढ मजबूत असली, तरी नव्या डिजिटल आणि आधुनिक व्यवसायांमधून अपेक्षित नफा मिळत नसल्याने समूहावर काहीसा दबाव आहे.
  • आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा सन्सचा महसूल २४ टक्क्यांनी वाढून ५.९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता, मात्र समूहाचा निव्वळ नफा १७ टक्क्यांनी घसरून २८,८९८ कोटी रुपयांवर आला होता.
  • टाटा समूहाला होणाऱ्या एकूण निव्वळ नफ्यामध्ये एकट्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चा वाटा तब्बल ४३ टक्के एवढा मोठा आहे. आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर नव्या व्यवसायांनी नफा वाढवावा, यासाठी समूह सध्या प्रयत्नशील आहे.
  • समूहाच्या नवीन कंपन्यांमध्ये होत असलेल्या मोठ्या भांडवली गुंतवणुकीवर टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी यापूर्वी काही शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, भारताच्या उत्पादन क्षेत्राला बळ देणाऱ्या ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’च्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले आहे.
  • या सर्व पार्श्वभूमीवर, समूहाचे प्रमुख म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत चंद्रशेखरन यांनी या वर्षाची पगारवाढ नाकारून कॉर्पोरेट जगतात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या घडामोडीवर टाटा सन्सने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

टाटा समूहात अंतर्गत वाद

गेल्या काही दिवसांपासून टाटा उद्योग समूहात अंतर्गत वाद पेटला आहे. टाटा ट्रस्ट्सचे माजी ट्रस्टी मेहली मिस्त्री यांनी ट्रस्टच्या विद्यमान नेतृत्वाला आणि प्रशासकीय व्यवस्थेला थेट महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांसमोर आव्हान दिले आहे. गेल्याच महिन्यात मिस्त्री यांना ‘सर रतन टाटा ट्रस्ट’मधून हटवले होते. या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. याशिवाय ट्रस्टींच्या नियुक्त्या, बोर्डाचे निर्णय, त्यांना मिळणारे मानधन आणि एकूणच टाटा समूहातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अशावेळी समूहाचे प्रमुख या नात्याने एन चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.