नवी दिल्ली : कंपन्यांशी संबंधित कायदेशीर वादांची सुनावणी आणि निकाल देणारी न्यायिक संस्था ‘राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी)’ आणि तिची अपीलीय प्राधिकरण – ‘एनसीएलएटी’च्या स्वायत्ततेवर थेट गदा येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. ‘कंपनी व्यवहार मंत्रालयाने या संस्थांना पूर्णपणे ताब्यात घेतले आहे आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,’ अशी कठोर टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केली.
एनसीएलटी आणि एनसीएलएटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व सेवेशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या संस्थांच्या अध्यक्षांना भरती प्रक्रिया आणि प्रशासकीय कामात पूर्ण स्वायत्तता देण्याची गरज व्यक्त केली. तसेच अंतरिम उपाय म्हणून प्रतिनियुक्ती (डेप्युटेशन) पद्धतीचा वापर करावा आणि त्यानंतर यूपीएससी किंवा एसएससीद्वारे टप्प्याटप्प्याने नियमित भरती प्रक्रिया राबवावी, असे न्यायालयाने सुचवले.
सरन्यायाधीशांनी तोंडी टिप्पणीत नमूद केले की, ‘कंत्राटदार कसे खेळ खेळतात हे मला माहीत आहे. न्यायाधिकरणाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. अध्यक्षांच्या हातात पूर्ण स्वायत्तता असायला हवी. तथापि सरकारच्या कंपनी मंत्रालयाला या संस्थेवर पूर्ण पकड ठेवायची आहे, ज्यामुळे या न्यायिक संस्थेचे स्वातंत्र्य बाधित होत आहे.‘
न्यायालयीन कामकाजात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या पद्धतीवर सरन्यायाधीशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कंत्राटदारांकडून नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्यायिक किंवा तांत्रिक सदस्यांशी काहीही देणेघेणे नसते. मुंबईतील एका घटनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, तेथे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मूळ अहवालच पळवून नेला होता आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा – ‘एफआयआर’ दाखल करावा लागला होता. अशा प्रकारच्या भरतीमुळे न्यायिक व तांत्रिक सदस्यांवर दबाव आणला जातो, असेही ते म्हणाले.
अशा महत्त्वाच्या न्यायिक संस्थेत कायमस्वरूपी भरतीच केली जायला हवे, असे न्यायालयाने स्पष्टपणे सूचित केले. याचिकाकर्त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी बाजू मांडताना सांगितले की, गेली सहा वर्षे आणि दीर्घकाळापासून काम करत असलेल्यांना अचानक कामावरून काढून टाकू नये. एका खासगी कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीमुळे त्यांना अचानक कामावरून काढले जाऊ नये, अशी त्यांनी विनवणी केली. यावर न्यायालयाने पुढील निर्णयापर्यंत अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय कर्मचाऱ्यांना न हटवण्याचे निर्देश दिले.
