neha marda startup phitku marathi : लोकप्रिय हिंदी टिव्ही मालिका ‘बालिक वधू’तील ‘गहना’ नावाचे पात्र आठवतंय का? तिचे खरे नाव नेहा मर्दा अग्रवाल असून आज ही अभिनेत्री २०० कोटी रुपयांच्या व्यवसायाची मालकीन बनली आहे. तेही तुमच्याआमच्या घरात मिळणाऱ्या ‘तुरटी’च्या जोरावर. ‘फिटकू’ (Phitku) नावाचा तिचा हा ब्रँड आज तरुणांमध्ये लोकप्रिय बनला आहे. नुकतेच देशातील अग्रगण्य खासगी इक्विटी फर्म ‘अनंत कॅपिटल’ने ‘फिटकू’ या प्रसिद्ध ब्रँडमध्ये बहुतांश हिस्सेदारी खरेदी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार सुमारे १०० कोटी रुपयांना झाला असून, यामुळे या स्टार्टअपचे एकूण मूल्यांकन २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘पिटकू’ नेमकं काय आहे?
कंपनीची संस्थापक नेहाने सांगितलं, की प्रसुतीनंतर माझ्या शरीराचा गंध बदलून गेला होता. यासाठी बाजारात मी अनेक प्रॉडक्ट शोधले. पण, कोणीही माझी समस्या दूर केली नाही. मग मीच यावर विचार करायला सुरुवात केली. यातूनच तुरटीवर आमची नजर पडली. जी निर्जंतुकीकरणामध्ये वापरली जाते. यातूनच मग पूर्णपणे नैसर्गिक डिओडोरंट्सचा जन्म झाला. या उत्पादनाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
कंपनीचे नेतृत्व बदलणार नाही
१ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या व्यवहारामध्ये प्राथमिक भांडवल गुंतवणूक आणि दुय्यम समभागांची खरेदी या दोन्हीचा समावेश आहे. या गुंतवणुकीनंतरही कंपनीचे मूळ संस्थापक सुमित मर्दा, नेहा मर्दा आणि राहुल डोकानिया हे कंपनीमध्ये आपला मोठा हिस्सा राखून ठेवणार असून, व्यवसायाचे नेतृत्वही त्यांच्याकडेच राहणार आहे.
केवळ एका वर्षात ६ लाख ग्राहक!
२०२५ च्या सुरुवातीला स्थापन झालेल्या ‘फिटकू’ या कंपनीने तुरटीवर आधारित डिओडोरंट्स आणि वैयक्तिक स्वच्छतेची उत्पादने बाजारात आणून ग्राहकांमध्ये अल्पावधीतच मोठी पसंती मिळवली आहे. विशेष म्हणजे, स्थापनेपासूनच हा स्टार्टअप नफ्यात चालत असून, आतापर्यंत ६ लाखांहून अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आहे. या नव्या निधीचा वापर उत्पादन संशोधन, ब्रँड बिल्डिंग, तसेच डी२सी, ऑनलाईन मार्केटप्लेस आणि क्विक कॉमर्सवर विस्तार करण्यासाठी केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
नैसर्गिक उत्पादनांना मागणी
आजचा ग्राहक अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या उत्पादनांकडे वळत आहे. ‘फिटकू’ने तुरटीसारख्या आपल्या पारंपारिक आणि विश्वासू घटकाला आधुनिक रूपात सादर केले आहे. या नव्याने उदयास येणाऱ्या श्रेणीचे नेतृत्व करण्याची क्षमता या ब्रँडमध्ये आहे, असे अनंत कॅपिटलचे संस्थापक आशुतोष टापरिया यांनी म्हटले आहे.
