New EPF Scheme 2026 Rules : तुम्ही जर खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना २०२६ लागू करण्याची प्रक्रिया कंपन्यांनी सुरू केली आहे. या नवीन नियमांमुळे तुमच्या पगारातून किती पीएफ (PF) कापला जाईल यासाठी तुमच्याकडे ३ पर्याय आहेत. तुमच्या पगाराच्या १२ टक्के, ९ टक्के की दरमहा फक्त १८०० रुपये. हातातील पगार वाढवायचा की PF मधील योगदान? हे आता तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र, तुमचा हा निर्णय केवळ टेक-हँड सॅलरीवर परिणाम करणार नाही, तर तुमच्या निवृत्तीनंतरच्या पैशांवरही याचा मोठा प्रभाव पडेल. कारण, सध्या सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांमध्ये ईपीएफओ सर्वोत्तम मानली जाते.
१. १२% योगदार : निवृत्तीनंतरच्या सुखासाठी सर्वोत्तम
जर तुमचे उद्दिष्ट केवळ निवृत्तीनंतरचा मोठा फंड गोळा करणे हे असेल, तर १२% चा पारंपारिक पर्यायच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. १२% चा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा अफाट फायदा मिळतो. २५ ते ३० वर्षांच्या कारकिर्दीत अगदी लहान कपातीचा फरकही शेवटी लाखो रुपयांच्या फरकात रूपांतरित होतो. ज्यांचे आर्थिक नियोजन स्थिर आहे, त्यांच्यासाठी हा सुरक्षित मार्ग आहे.
२. ९ टक्के योगदान… सुवर्णमध्य
तुम्ही नवीन घर खरेदी केलं असेल किंवा शिक्षणाचा खर्च वाढला असेल आणि थोडे अधिक पैसे हवे असतील तर हा पर्याय चांगला आहे. यात तुमच्या पगारात थोडी वाढ होते आणि पीएफमधील बचतही पूर्णपणे थांबत नाही. अधिकचे पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूनही चांगला नफा मिळवू शकतात.
३. १,८०० चा निश्चित पर्याय: हातात जास्त पैसा, पण…
या पर्यायामध्ये तुमच्या पगारातून दरमहा केवळ १,८०० रुपये कापले जातील, ज्यामुळे तुमची ‘टेक-होम’ सॅलरी म्हणजे हातात येणाऱ्या पगारात घसघशीत वाढ होईल. पण, पीएफवर मिळणारे खात्रीशीर व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा मोठा लाभ तुम्हाला गमवावा लागेल. जर तुम्ही हा वाचलेला पैसा नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात शिस्तबद्धपणे गुंतवणार असाल, तरच हा मार्ग निवडा. कारण, हे पैसे रोजच्या खर्चात उडाले तर निवृत्तीनंतर हातात काही उरणार नाही.
पीएफ कमी कापल्यास कंपनी तो फरक पगारात देणार का?
बहुतांश कर्मचाऱ्यांचा असा समज आहे की, पीएफ योगदान कमी केल्यास मालकाचा वाचलेला हिस्सा त्यांच्या हातात पगार म्हणून दिला जाईल. पण प्रत्यक्षात तसे नाही. कायद्यानुसार, जर तुम्ही ९ टक्के किंवा १,८०० रुपयांचा पर्याय निवडला, तर कंपनीचे वैधानिक पीएफ योगदानही त्याच प्रमाणात कमी होते. हा वाचलेला हिस्सा तुम्हाला थेट पगार म्हणून देण्याचे बंधन कंपनीवर नाही. हा फरक तुमच्या ‘सीटीसी’मध्ये ठेवून इतर भत्त्यांमध्ये वर्ग करायचा की कंपनीने स्वतःकडे ठेवायचा, हा सर्वस्वी कंपनीच्या अंतर्गत धोरणाचा आणि तुमच्या कराराचा भाग असेल.
निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या ‘एचआर’ला हा एक प्रश्न नक्की विचारा
जर मी कमी पीएफ योगदानाचा (९% किंवा १,८०० रुपये) पर्याय निवडला, तर माझ्या सीटीसीमध्ये कोणताही बदल न करता, कंपनीच्या वाचलेल्या पीएफ वाट्याची रक्कम माझ्या पगारात इतर घटकांच्या स्वरूपात जोडून दिली जाईल का? या प्रश्नाच्या उत्तरावरच तुमचा अंतिम निर्णय अवलंबून असला पाहिजे. जर कंपनी हा वाटा तुमच्या पगारात जोडणार नसेल, तर १२% चा पर्याय सुरू ठेवणेच तुमच्या हिताचे ठरेल!
