New York City Tax Crisis BlackRock Larry Fink Mayor Zohran Mamdani: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी (मालमत्ता व्यवस्थापन) असलेल्या ब्लॅकरॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी फिंक यांनी महापौर झोहरान ममदानी यांच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्क शहराच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, व्यवसायासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास आपण आपले व्यवसाय अन्न शहरांमध्ये हलवू शकतो, असेही त्यांनी सूचित केले. “मला न्यूयॉर्कची चिंता वाटते”, असे लॅरी फिंक यांनी ॲस्पेन इन्स्टिट्यूटच्या ‘आयडियाज फेस्टिव्हल’मध्ये बोलताना म्हटले.

सीएनएनचे सूत्रसंचालक फरीद झकारिया यांच्याशी बोलताना फिंक यांनी सांगितले की, ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांच्याशी शेवटची चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी एक “महत्त्वाची आकडेवारी” सादर केली, ज्यानुसार न्यूयॉर्क शहराला मिळणाऱ्या एकूण करांपैकी ४७% कर हे शहरातील सर्वात श्रीमंत १% लोकांकडून येतात.

“त्यामुळे, जर आपण अशा १% गटातील ५,००० लोकांना गमावले, तर या प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या इतर सर्व उपाययोजनांचा प्रभाव त्यातून निष्प्रभ ठरेल. सध्याची परिस्थिती पाहता, आपण अशा ५,००० किंवा त्याहून अधिक लोकांना गमावणार आहोत”, असा इशारा फिंक यांनी दिला.

अब्जाधीश असलेल्या फिंक यांनी यावेळी शहराच्या “गेल्या १३ वर्षांतील कमकुवत प्रशासनांवर” कठोर टीका केली आणि मायकल ब्लूमबर्ग हे न्यूयॉर्क शहराचे “शेवटचे सर्वोत्तम महापौर” होते असे, म्हटले.

न्यूयॉर्क शहराच्या कर प्रणालीवर बोलताना ते म्हणाले, “अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत जीवनमानाचा जो दर्जा दिसून येत आहे, ते पाहणे खरोखरच दुःखद आहे. न्यूयॉर्कचा रहिवासी म्हणून करांचा पूर्ण बोजा उचलण्यात मला कधीच अडचण वाटली नाही, असे मी नेहमीच म्हणत आलो आहे. पण आता परिस्थिती असंतुलित झाली आहे. मी जो कर भरतो, त्या बदल्यात मला योग्य त्या सेवा मिळत आहेत, असे मला वाटत नाही.”

फिंक यांनी नेदरलँड्समधील करप्रणालीचा दाखला दिला. त्यांनी सांगितले, “तिथे सर्वाधिक उत्पन्न असलेल्यांना ५०% कर भरावा लागतो, परंतु त्याबदल्यात त्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि शिक्षण मिळते. न्यूयॉर्कमध्ये मला तशी सुविधा मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. यामध्ये गैरव्यवस्थापन हीच खरी समस्या आहे.”

८ हजार नोकऱ्या धोक्यात?

यावेळी लॅरी फिंक यांना विचारण्यात आले की, ब्लॅकरॉक न्यूयॉर्कमधील नोकऱ्या इतरत्र हलवण्याचा किंवा इतर ठिकाणी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे का?

याला उत्तर देताना फिकं म्हणाले, “आमचे जगभरात सुमारे २५००० ते २६००० कर्मचारी आहेत आणि त्यापैकी साधारण ८००० कर्मचारी न्यूयॉर्कमध्ये आहेत. म्हणजेच आम्ही पद्धतशीरपणे विस्तार केला आहे. जर न्यूयॉर्क शहरातील परिस्थिती कमकुवत झाली, तर इतर व्यवसायांप्रमाणेच आम्हीही केवळ नोकऱ्या हलवण्याचाच नाही, तर आमची अमेरिकेतील अधिक संसाधने दुसऱ्या एखाद्या ठिकाणी वळवण्याचाही विचार करू.”